‘इन्फ्लूअर्स’चा सुळसुळाट गुगल, फेसबुक, इन्स्टाग्रामच्या यंत्रणेची नजर.
नागपूर: एखाद्या ‘इन्फ्लूअर्स’चे लाईक, फालोअर्स बघून उत्पादक कंपन्या त्यांच्याद्वारे उत्पादनाची जाहिरात करून घेण्याचे अलिकडे मोठे पेव फुटले आहे. याबाबत गुगल, फेसबुक, इन्स्टाग्रामच्या यंत्रणेची नजर असून या विकत घेतलेल्या फेक लाईक व फालोअर्सची संख्या पाहून जाहिरात देणाऱ्या कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता बळावली आहे. एवढेच नव्हे स्वतःच्या इमेज बिल्डिंगसाठी या इन्फ्लूअर्सची मदत घेणाऱ्या नेत्यांचीही त्यांना न कळत लूट होण्याची शक्यता आहे.
सोशल मिडियामुळे व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. यात एखाद्याच्या फेसबूक किंवा इन्स्टाग्रामवर २० हजार ते ५० हजारांवर फालोअर्स असल्यास लहान-मोठे उद्योजक त्यांना जाहिरात करण्याची ऑफर देतात. ज्याचे मोठ्या प्रमाणात लाईक किंवा फालोअर्स असतात त्यांना इन्फ्लूअर्स म्हटले जाते, असे सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक अजित पारसे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे फालोअर्स किंवा लाईकची संख्या पाहूनच उद्योजक अशाप्रकारे जाहिरातीसाठी पुढाकार घेतात. कमीत कमी खर्चात ही जाहिरात होत असल्याने उद्योजक इन्फ्लूअर्सकडे वळले. हीच बाब राजकीय नेत्यांची आहे.
अलिकडे अनेक राजकीय नेतेही इमेज बिल्डिंगसाठी अशा इन्फ्लूअर्सची मदत घेतात. परंतु हे उद्योजक, राजकीय नेते या इन्फ्लूअर्सचे जेवढे लाईक, फालोअर्स आहेत, त्यांच्याशी त्याचा संवाद आहे की नाही, याकडे बघत नाही. यातूनच त्यांची फसवणूक होण्याची भीती पारसे यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे सद्यस्थितीत अनेक संकेतस्थळ उपलब्ध आहेत, ज्यावर अडीचशे रुपयांत पाचशे लाईक्स किंवा फालोअर्स विकत मिळतात.
इन्फ्लूअर्स या संकेतस्थळावरूनच लाईक किंवा फालोअर्स विकत घेऊन उद्योजक, नेत्यांना मोठे आकडे दाखवून जाळ्यात ओढतात. परंतु जेव्हा हे इन्फ्लूअर्स एखाद्या उत्पादकाची जाहिरात करतात, त्यावर गुगल, फेसबूक, इन्स्टाग्रामच्या यंत्रणेची पूर्णपणे नजर असते.
विशेष म्हणजे या इन्फ्लूअर्समुळे फेसबुक, इन्स्टाग्राम, गुगलच्याही जाहिरात व्यवसायाला फटका बसतो आहे. परिणामी गुगल, फेसबुक, इन्स्टाग्रामची यंत्रणा इन्फ्लूअर्सचे फेक लाईक्स, फालोअर्स काही मिनिटांमध्येच शोधून काढते अन् या अवैध मार्केटिंगच्या प्रक्रियेवरून संबंधित कंपन्यांवर कायदेशीर कारवाई केली जाते. यातून या कंपन्यांची प्रतिष्ठा आणि पैसा दोन्ही धुळीस मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पॉप सिंगर बादशाहलाही बसला फटका
यू ट्युबवर एका गाण्याला २४ तासांत सर्वाधिक लाईक्स जागतिक विक्रम नोंदविण्यासाठी पॉप सिंगर बादशाहने ७२ लाख रुपये मोजून लाईक्स व फालोअर्स खरेदी केले होते, ही बाब मागील वर्षी ऑगस्टमध्ये उघडकीस आली होती. मुंबई पोलिसांनी याबाबत दुजोरा दिला होता. ही बाब उघडकीस आल्यानंतर त्यालाही मोठा फटका बसला होता. असेच प्रकार आता वाढत आहेत.
अनेक ‘इन्फ्लूअर्स’कडून विविध ब्रॅन्डच्या जाहिराती केल्या जातात. परंतु उद्योजक, नेत्यांनी या इन्फ्लूअर्सचा फोलोअर्ससोबत संवाद आहे की नाही, हे बघण्याची गरज आहे. अनेकदा इन्फ्लूअर्सला पैसा देऊनही हवे ते परिणाम का मिळत नाही, असा विचार गुंतवणूकदार करीत असतात. केवळ लाईक्स, फालोअर्सची संख्या मोठी म्हणून जाहिरात देणे महागात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.