नागपूर : मंत्रालयातील बनावट नोकरी घोटाळ्याचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हुडकेश्वर पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणातील एका आरोपीला अटक केली आहे. तर सहा आरोपी अजूनही फरार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील मंत्रालयात बनावट मुलाखत घेऊन सात जणांच्या टोळीने एका तरुणाला ९ लाख ५५ हजार रुपये लुबाडले. कनिष्ठ लिपिकाच्या नोकरीचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली होती. मंत्रालयाच्या आवारातच मुलाखत घेण्यात आल्याने पीडित युवकाची पूर्ण खात्री पटली आणि त्याने पैशांचा सौदा केला.
हुडकेश्वर पोलिसांनी या प्रकरणात लॉरेन्स हेन्री (४५, रहिवासी म्हाळगी नगर, नागपूर) याला अटक केली आहे. तर फरार आरोपींमध्ये शिल्पा उदापूर (४०), वसंतकुमार ऊर्फ वसंतराव उदापूर (६०), विजय पाटणकर (४०), नितीन साठे (४१), सचिन डोलस (४५) आणि एक शिपाई यांचा समावेश आहे.
या घोटाळ्यामुळे पुन्हा एकदा मंत्रालयातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.