नागपूर : नागपुरातील तडीपार गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. वर्षभरासाठी नागपूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार सोहेल उर्फ ‘चाकू’ मोईनुद्दीन अन्सारी याला तहसील पोलिसांनी शहरात बेकायदेशीरपणे वावरताना अटक केली. आरोपी तडीपार आदेशाचे उल्लंघन करत असल्याचे उघड झाले असून, तो एका गुन्ह्यातही फरार होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोबीनगर परिसरात दोन गटांमध्ये वाद सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसील पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहताच एक युवक पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. संशय आल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याची ओळख सोहेल उर्फ ‘चाकू’ अन्सारी अशी पटली.
तपासात समोर आले की, १६ फेब्रुवारी २०२६ पासून एका वर्षासाठी त्याला नागपूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. मात्र कोणतीही परवानगी न घेता तो शहरात राहत होता.
याशिवाय, आरोपीने आपल्या २५ वर्षीय प्रेयसीसोबत एका नातेवाईक महिलेच्या घरात घुसून घर रिकामे करण्यासाठी दबाव टाकला, तिच्यावर मारहाण केली, विनयभंग केला आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रारही पोलिसांकडे दाखल आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.





