Published On : Thu, Aug 20th, 2020

आयटीआय प्रवेश अर्जासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ – नवाब मलिक

Advertisement

Nawab Malik

मुंबई: – चालू शैक्षणिक वर्षाकरीता सध्या सुरु असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

दरम्यान ही मुदत उद्या २१ ऑगस्ट रोजी संपणार होती. त्यास आता मुदतवाढ देण्यात येत आहे.

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सन २०१५ ते सन २०१९ या प्रवेशसत्रात प्रवेशासाठी उपलब्ध जागांच्या सरासरी २.२५ पट अर्ज प्राप्त झाले होते. तथापि, चालू वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत उपलब्ध जागांच्या फक्त १.४५ पट अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यात काही भागात स्थानिक लॉकडाऊन असल्याने प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे. दुर्गम व ग्रामीण भागात इंटरनेटच्या काही अडचणी येत आहेत. तसेच एकुण उपलब्ध जागांच्या तुलनेत प्राप्त प्रवेश अर्ज अधिक असले तरी काही विशिष्ट व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी किंवा काही तालुक्यात उपलब्ध जागांच्या तुलनेत कमी विकल्प प्राप्त झाल्याचे निदर्शनास आले आहे. शिवाय नियमित प्रशिक्षण सुरू होण्यासाठी अजून अवकाश आहे. त्यामुळे कौशल्य प्रशिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात येत असल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

आयटीआय प्रवेशप्रक्रीया १ ऑगस्टपासून सुरू आहे. राज्यातील ४१७ शासकीय व ५६९ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ८४ व्यवसाय अभ्यासक्रमांच्या एकूण ६ हजार ८६८ तुकड्यांमधून एकूण १ लाख ४५ हजार ६३२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यापैकी अमरावती विभागात १७ हजार ९८४, औरंगाबाद विभागात १९ हजार २४४, मुंबई विभागात १९ हजार ९४८, नागपूर विभागात २८ हजार १३६, नाशिक विभागात २९ हजार ५००, पुणे विभागात ३० हजार ८२० जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यासाठी १९ ऑगस्टपर्यंत २ लाख ५५ हजार ८०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी २ लाख २१ हजार ५८५ विद्यार्थ्यांनी शुल्क अदा केले असून त्यापैकी २ लाख ०७ हजार २८५ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठीचे विकल्पही भरले आहेत. यावरून नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ४८ हजार ५१८ विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश अर्ज भरण्याची कार्यवाही पूर्ण केली नसल्याचे निदर्शनास येते असेही नवाब मलिक म्हणाले.

आयटीआय प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांना सर्व माहिती उपलब्ध व्हावी यासाठी विभागामार्फत प्रवेश प्रोत्साहन अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आयटीआय संस्थेत दररोज समुपदेशन सत्र आयोजित करण्यात येत आहेत. दुर्गम व ग्रामीण भागास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कर्मचारी भेट देऊन लॅपटॉपव्दारे इच्छुक विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेत आहेत. प्रवेश अर्ज मोबाईलव्दारे देखील भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच ज्या भागातून कमी अर्ज प्राप्त झाले आहेत त्या भागात प्रवेश अर्ज भरण्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत अशी माहितीही मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचण आल्यास त्यांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीची किंवा प्रादेशिक विभागनिहाय नेमून दिलेल्या कॉलसेंटरची मदत घ्यावी. तसेच आवश्यकता भासल्यास नजिकच्या आयटीआय संस्थेशी संपर्क साधून विहित मुदतीत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची दक्षता घ्यावी. कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वत:चे जीवनमान उंचावण्यासाठी उपलब्ध संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement