Published On : Thu, Aug 20th, 2020

कोरोनामुळे मृत रुग्णांच्या अंत्यसंस्काराबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

नागपूर : जिल्हयात कोविड-19 च्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्याअनुषंगाने मोठ्या प्रमाणात रुग्णांचे मृत्यु होत असल्याने त्यांचे अत्यंसंस्कार, त्यांच्या स्थानिक क्षेत्रात शासन निर्देशानुसार करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिले आहेत.

ज्याअर्थी, कोरोना रुग्णांची संख्येत वाढ होत आहे तसेच शासन निर्देशानुसार त्यांना होम आयसोलेशन सुरु करण्यात आले आहे. काही बाबतीत अशा रुग्णांच्या मृत्यू होतो. काही क्षेत्रात कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींची अंत्यसंस्कार करण्याबाबत स्थानिक नागरीकांचा विरोध असतो, त्यामुळे मृत व्यक्तींच्या परीजनांना मृतदेह अंत्यसंस्कारासाठी इतर ठिकाणी नेणे भाग पडते अशा ठिकाणी सुध्दा कधी कधी लोकांचा विरोध निर्माण होतो.

अशा परिस्थितीत व्यक्तींच्या कुटूंबियांना नाहक शारिरीक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागते. मृत व्यक्तीचे अंत्यसंस्काराबाबत नियमित दहनघाटावर दहन करण्याचे विरुध्द कुठलेही निर्देश नसतांना गैरसमजूतीमुळे लोकांकडून विरोध होतो. या करीता लोकांमध्ये जागरुकता निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे.


यापुढे कुठेही अंत्यसंस्कारास विरोध होवू नये याकरीता असे कोरोना रुग्ण मृत झाल्यास त्याचे क्षेत्रातील रहिवाश्याचे दहन घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. कोणतीही व्यक्ती किंवा दहन घाटाचे प्रभारी अधिकारी अंत्यसंस्कारास अडथळा करणार नाहीत. शासनद्वारे निर्गमित एसओपीचे पालन करणे आवश्यक राहील. अशा कामात कोणी बाधा आणल्यास ते आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय दंड संहिता अ नुसार कार्यवाहीस पात्र राहतील, असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिले आहेत.