नागपूर : शहरातील गुन्हे शाखा युनिट ५ ने आर्यनगर, कोराडी परिसरातील महालक्ष्मी रेसिडेन्सी या इमारतीत सुरू असलेले वेश्याव्यवसायाचे रॅकेट उद्ध्वस्त केले. ३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ४.४५ च्या सुमारास पोलिसांनी चौथ्या मजल्यावरील सदनिकेवर छापा टाकला आणि या कारवाईत एक पीडित महिला सुटका करण्यात आली.
ही कारवाई विशिष्ट माहितीच्या आधारे करण्यात आली असून, आरोपी वंदना अनिल मेहराम (वय ५०) हिने पैसे घेऊन वेश्याव्यवसायासाठी सदनिका उपलब्ध करून दिल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तिला घटनास्थळीच अटक केली. घटनास्थळावरून दोन मोबाईल फोन, रोख ₹२,००० आणि इतर साहित्य असा एकूण ₹३२,३४८ किमतीचा माल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी आरोपी विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या (BNS) कलम १४३(२) तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा (PITA) १९५६ अंतर्गत कलम ३, ४ आणि ५ नुसार कोराडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी व जप्त साहित्य कोराडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) वसंत परदेशी, उपायुक्त (डिटेक्शन) राहुल मकणीकर, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संदीप बुवा आणि त्यांच्या पथकाने केली.