Published On : Tue, Sep 12th, 2017

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पतसंस्थेचा सुवर्ण महोत्सवानिमित्त उत्कृष्ट अभियंतांचा गौरव

नागपूर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एम्प्लाईज को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विभागातील उत्कृष्ट अभियंते, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महापौर नंदाताई जिचकार यांच्या हस्ते करण्यात आला.

डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्रेडीट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता उल्हास देबडवार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक अभियंता प्रशांत नवघरे, कार्यकारी अभियंता संजय इंदूरकर, सौ. निता ठाकरे, सुषमा साखरवाडे, तसेच संस्थेचे अध्यक्ष अनिल देशमुख उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकारी पतसंस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध समाजप्रयोगी उपक्रम साजरे करताना वृषारोपण, गरीब विद्यार्थ्यांना सहाय्य तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवाबद्दल संस्थेच्या सभासदांच्या कार्याचे कौतुक करताना महापौर श्रीमती नंदाताई जिचकार म्हणाल्या की, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते, पूल, तसेच शासकीय इमारतीचे उत्कृष्ट बांधकाम करुन जनतेला चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यासोबत सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकारी पतसंस्थेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त स्मरणिका प्रकाशित करण्यात आली असून यावेळी संस्थेच्या माजी पदाधिकारी, उत्कृष्ट कार्याबद्दल संस्थेतर्फे शाल व श्रीफळ देवून गौरव करण्यात आला. तसेच दहावी व बारावीचे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महापौर श्रीमती जिचकार यांनी केला. यावेळी मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अधीक्षक अभियंता प्रशांत नवघरे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष अनिल देशमुख यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात संस्थेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सुवर्ण महोत्सवी वर्षात आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली. संचलन व आभार संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर आसरे यांनी मानले.

यावेळी मुख्य अभियंता उल्हास देबडवार, संस्थेचे अध्यक्ष अनिल देशमुख तसेच सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महापौर नंदाताई जिचकार यांनी संस्थेतर्फे शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून गौरव केला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.