Published On : Tue, Sep 12th, 2017

शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी जिल्हयात 1 लक्ष 52 हजार 345 ऑनलाईन नोंदणी

Farmer

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी 1 लक्ष 52 हजार 345 शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहे. शेतकरी कर्जमाफी मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज 15 सप्टेंबरपर्यंत स्वीकारण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करुन कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा सूलभपणे लाभ घेता यावा यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हयातील 530 आपले सरकार सेवाकेंद्र, 165 सुविधा सेतूकेंद्र तसेच नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 72 शाखांमध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या केंद्रांवर कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहे. अद्यापपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले नाही त्यांनी 15 सप्टेंबरपूर्वी कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ होणार असून यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सूलभ तसेच पूर्णत: मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी बॉयोमेट्रीक डिवाईस सुध्दा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या सन 2015-16 या वर्षातील पीक कर्जाची पुर्णत: परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 25 टक्के किंवा 25 हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन मिळणार आहे यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. कर्जमाफीसाठी जिल्हयात 77 हजार 011 कुटूंबांनी नोंदणी केली आहे.

कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तालुका व महसूल मंडळस्तरावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासोबतच कर्जमाफीचे अर्ज भरण्याची सुविधा सुध्दा उपलब्ध आहे. यासाठी महसूल तसेच जिल्हा परिषद, जिल्हा सहकारी निबंधक यासोबतच तालुका कृषी अधिकारी व राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सहाय्य करत आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या महसूल विभागाला तात्काळ सादर करावयात. त्यानुसार ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ऑनलाईन अर्ज भरेल नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभासाठी सहकार्य करण्यात येईल, अशी माहितीही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.

योजनेच्या लाभासाठी संपर्क
शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभासाठी अडचण येत असल्यास 7887463290 हा टोलफ्री क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला असून सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत यावर संपर्क साधावा. असे आवाहन करताना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे म्हणाले की, कर्जमाफी योजनेची प्रक्रिया पूर्ण करताना तक्रार असल्यास ती सोडविण्यसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. कर्जमाफी योजनाचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज 15 सप्टेंबरपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. अद्यापपर्यंत नोंदणी केली नसल्यास तात्काळ ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.