Published On : Tue, Mar 5th, 2019

सर्वांना समान न्याय या तत्त्वाने कार्य करणार : प्रदीप पोहाणे

नवनिर्वाचित स्थाथी समिती सभापतींचे पदग्रहण

नागपूर : स्थायी समितीचे सभापती म्हणून आज पदभार स्वीकारला असला तरी त्या पदाची गरीमा आपल्याला माहिती आहे. आता जबाबदारी वाढली आहे. विकासाच्या दृष्टीकोनातून या पदावरून कार्य करीत असतानाच कुणालाही नाराज होऊ देणार नाही. सर्वांना समान न्याय या तत्त्वावरच आपण कार्य करणार असल्याचे प्रतिपादन नागपूर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी व्यक्त केला.

स्थायी समितीचे सभापती म्हणून अविरोध निवड झाल्यानंतर मनपा मुख्यालयाच्या हिरवळीवर आयोजित पदग्रहण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार होत्या. यावेळी मंचावर आमदार सुधाकर देशमुख, भाजपचे शहर अध्यक्ष तथा आमदार सुधाकर कोहळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार विकास कुंभारे, मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, मावळते स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, स्थायी समितीचे सदस्य जगदीश ग्वालबंशी, मनिषा अतकरे, यशश्री नंदनवार, मंगला खेकरे, सोनाली कडू, वंदना भगत, संजय चावरे, शेषराव गोतमारे, संजय बुर्रेवार, महेश महाजन, सुनील हिरणवार, दिनेश यादव, गार्गी चोपडा उपस्थित होते.

पुढे बोलताना स्थायी समितीचे नवनिर्वाचित सभापती प्रदीप पोहाणे म्हणाले, राजकीय क्षेत्रात कार्यकर्ता ते स्थायी समिती सभापती म्हणून जी वाटचाल झाली त्याचे खरे श्रेय हे आमदार कृष्णा खोपडे यांना जाते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून विकासाचा नवा अध्याय लिहिण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. स्थायी समितीचे सभापती म्हणून आता संपूर्ण शहराची जबाबदारी आपल्यावर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, नागपूर शहरातील सर्व आमदार, महापौर आणि मनपातील सर्व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात ही जबाबदारीही आपण यशस्वीपणे पार पाडू, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.

महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, भाजपचे शासन हे पारदर्शक शासन आहे. ना. नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नागपूर शहराचा विकास करण्याची जबाबदारी आणि नागरिकांना उत्कृष्ट मुलभूत सोयी पुरविण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून आमची आहे. ही जबाबदारी सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने आम्ही पार पाडत आहोत. मनपातील शासनही पारदर्शक असून प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकांना सोबत घेऊन चालणे, हीच आमची भूमिका आहे. युवा कार्यकर्ते प्रदीप पोहाणे यांच्यावर पक्षाने टाकलेल्या विश्वास ते सार्थ ठरवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार सुधाकर कोहळे यांनी मावळते सभापती वीरेंद्र कुकरेजा यांचे अभिनंदन करीत आभार व्यक्त केले. त्यांचा कार्यकाळ हा मनपाची आर्थिक स्थिती सुधारण्यात गेला. जीएसटीचे अनुदान वाढविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. उपराजधानी म्हणून नागपूरला जाहीर झालेले विशेष अनुदान १५ वर्षानंतर खेचून आणण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह श्री. कुकरेजा यांची भूमिका मोठी आहे. त्यांच्या या कार्यामुळे पुढील वर्ष प्रदीप पोहाणे यांच्यासाठी विकासकार्याच्या दृष्टीने चांगले जाईल, असे ते म्हणाले.

आमदार सुधाकर देशमुख यांनीही यावेळी प्रदीप पोहाणे यांचे अभिनंदन करीत संपूर्ण नागपूरला विकासकार्यासाठी निधी त्यांच्या कार्यकाळात मिळेल, अशी आशा व्यक्त केली. आमदार प्रा. अनिल सोले यांनीही मनपाच्या आर्थिक स्थितीवर मात करून वीरेंद्र कुकरेजा यांनी मनपाला संकटातून बाहेर काढण्याची भूमिका उत्तमरीत्या निभावली. प्रदीप पोहाणे यांच्या कार्यकाळात मनपावरील आर्थिक संकट पूर्णपणे दूर होऊन नागपूर शहरात विकासकामांचा आलेख उंचावेल, असा विश्वास व्यक्त केला.

आमदार कृष्णा खोपडे म्हणाले, स्थायी समिती सभापती ही फार मोठी जबाबदारी आहे, प्रदीप पोहाणे हे सर्वांना घेऊन चालणारे व्यक्तिमत्व आहे. पूर्व नागपुरातील नगरसेवक म्हणून आपल्याला त्यांचे कार्य माहिती आहे. त्यांच्या कार्यकाळात विकासाला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनीही नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन करीत त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

मावळते सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी यावेळी त्यांच्या कार्यकाळातील अडचणी आणि त्यावर सर्व पदाधिकारी आणि सदस्यांच्या मदतीने केलेली मात याचे विवेचन केले. पदग्रहण समारंभाच्या पहिल्या दिवशी आलेला अनुभव सांगत मनपाची आर्थिक स्थिती बळकट करण्याचा आपण संकल्प केला होता. त्यात आपण यशस्वी झालो, असे सांगत नवनिर्वाचित सभापती प्रदीप पोहाणे यांना शुभेच्छा दिल्या.

तत्पूर्वी नवनिर्वाचित सभापती प्रदीप पोहाणे यांनी स्थायी समितीच्या कक्षात मावळते सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. महापौर नंदा जिचकार आणि मावळते सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रदीप पोहाणे यांचे कुटुंबीयही उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन मनपातील सत्तापक्ष उपनेते तथा नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी केले. आभार प्रतोद दिव्या धुरडे यांनी मानले. कार्यक्रमाला मनपातील सर्व पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.