Published On : Fri, Jul 12th, 2019

प्रत्येकाने पाच झाडे लावावी व जगवावी – केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर

महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण कार्यक्रम; मंत्री व खासदारांचा सहभाग

नवी दिल्ली : प्रत्येकाची वैयक्तिक ऑक्सिजन बँक तयार करण्यासाठी आयुष्यात किमान पाच झाडे लावावी व जगवावी असे आवाहन, केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज येथे वृक्षारोपण कार्यक्रमात केले.

महाराष्ट्र शासनाच्या ‘वनमहोत्सव मोहिम -2019’ अंतर्गत आज येथील कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनामधे महाराष्ट्र सदन व नवी दिल्ली नगरपालिका परिषदेच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्री. प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी खासदार सर्वश्री डॉ. जयसिध्देश्वर स्वामी, मनोज कोटक, इम्तियाज जलील,संजय मंडलिक, धैर्यशिल माने, ओमप्रकाश पवन राजेनिंबाळकर, नवी दिल्ली नगरपालिका परिषदेचे अध्यक्ष नरेश कुमार आणि महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर सहाय यावेळी उपस्थित होते. विविध प्रकारच्या 110 वृक्षांची लागवड यावेळी करण्यात आली.

वृक्षारोपण केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना श्री. जावडेकर म्हणाले, मानवी जीवनात वृक्षांचे स्थान अमूल्य आहे. वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देतात व हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात. वातावरण बदलामुळे मानवी समाजासमोर निर्माण झालेल्या संकटाला दूर सारण्यासाठी वृक्ष लागवडीची नितांत गरज आहे.त्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक ऑक्सिजन बँक तयार करण्यासाठी आयुष्यात किमान पाच झाडे लावावी व जगवावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच प्रत्येकाने आपल्या परस बागेत , घराजवळ लागवड केलेली झाडे, रोपे यांचे उत्तम संगोपन करावे असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र सदन व नवी दिल्ली नगरपालिका परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.

राज्यमंत्री अर्जुन खोतकर व विद्या ठाकूर यांनी केले वृक्षारोपण
राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास तथा वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला. उभय मंत्र्यांनी महाराष्ट्र सदनाच्या परिसरात वृक्षारोपण केले.

खासदारांचाही वृक्षारोपणात सहभाग
महाराष्ट्र सदनात निवासास असणा-या खासदारांनी यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला. डॉ. जयसिध्देश्वर स्वामी, मनोज कोटक, इम्तियाज जलील, संजय मंडलिक, धैर्यशिल माने, ओमप्रकाश पवन राजेनिंबाळकर, सुनिल तटकरे, सुनिल मेंढे यांनी महाराष्ट्र सदनाच्या परिसरात वृक्षारोपण केले.

110 वृक्षांची लागवड
महाराष्ट्र सदनात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते 110 वृक्षांची लागवड करण्यात आली. यामध्ये मोलसरी,अमलताश, गुलमोहर, चाफा, कडूनिंबए चंपा आदी वृक्षांसह पेरु, लिंबु,पाम, चिकू आदी फळझाडांचा समावेश आहे. आज पार पडलेल्या वृक्षारोपणामुळे महाराष्ट्र सदनाच्या सौंदर्यात आणखी भर पडेल व दिल्लीच्या पर्यावरण रक्षणात आणि प्रदूषण नियंत्रणात मदत होईल.

यावेळी सहायक निवासी आयुक्त विजय कायरकर, अजित सिंह नेगी, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह महाराष्ट्र सदनात स्थित विधी व न्याय विभाग, खासदार समन्वय कक्ष,सार्वजनिक बांधकाम विभाग, माहिती व तंत्रज्ञान विभाग, स्वागत कक्ष,महाराष्ट्र सुरक्षा दल आदी विभागांनी वृक्ष लागवडीत आपला सहभाग नोंदविला.