Published On : Fri, Jul 12th, 2019

विद्यार्थ्यांनी प्रयोगशील मार्गाने सहकारी तत्वावर खानावळ चालवावी – डॉ. फुके

नागपूर: आदिवासी वसतीगृहात खानावळीतून मिळणाऱ्या खाद्यान्नांचा दर्जा उत्तम राहावा यासाठी आदिवासी मुला-मुलींनी स्वत: वसतीगृहात प्रयोगशील मार्गाने सहकारी तत्वावर खानावळ चालवावी, असे आवाहन आदिवासी विकास,वने राज्य मंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले.
आदिवासी मुलांचे पारडी येथील शासकीय वसतीगृह तसेच हिवरीनगर येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह येथे आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी आज भेट देवून विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेतले. त्यावेळी ते बोलत होते.

आदिवासी मुलांचे तसेच मुलींच्या शासकीय वसतीगृहातील खाद्यपदार्थांचा दर्जा हा सुमार असल्याबाबतच्या तक्रारी आदिवासी विभागाकडे येत होत्या. यासंदर्भात शासनाच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण (डी.बी.टी.) योजनेव्दारे खानावळीसाठी दर महिन्याला 3,500 रुपये खात्यामध्ये जमा होतात. या रकमेतून विद्यार्थी हव्या असलेल्या खानावळीतून डबा मागवतात. परंतू ज्यादा शुल्क अदा करुन देखील खाद्यपदार्थांची गुणवत्ता निकृष्ट राहते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी एकत्रित येवून प्रायोगिक तत्वावर केवळ एक महिन्यासाठी सहकारी खानावळ चालवावी. यामध्ये गृहप्रमुख, गृहपाल यांच्या देखरेखीखाली आदिवासी वसतीगृहामध्ये खानावळ चालविकण्यासाठी इच्छूक उमेदवारांसाठी जाहिरात काढण्यात यावी.

या अंतर्गत खानावळीत स्वच्छता आणि दर्जा कायम राखून विद्यार्थ्यांना योग्य आहार पुरविणाऱ्या खानावळी चालकाची नेमणूक करावी. अन्न पदार्थ गृहप्रमुख, गृहपाल तसेच विद्यार्थ्यांच्या देखरेखीमध्ये वसतीगृहाच्या स्वयंपाक घरामध्ये बनविण्यात येतील. या योगे विद्यार्थ्यांना ताजे आणि उत्तम खाद्यपदार्थ वेळेवर उपलब्ध होतील. तरुण पिढी ही देशाचे भविष्य असल्यामुळे आपल्याला न्याय मिळावा यासाठी विद्यार्थ्यांनी निर्णय प्रक्रीयेत सहभागी होवून पुढाकार घेण्याचे आवाहन राज्यमंत्र्यांनी यावेळी केले.

राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी आदिवासी शासकीय वसतीगृहातील मुलांचे तसेच मुलींचे प्रश्न ऐकून संबधितांना त्याबाबत निर्देश दिलेत. विद्यार्थिर्नींनी ग्रंथालयामध्ये असणाऱ्या संगणकांसाठी इंटरनेटच्या सुविधेची मागणी केली. विद्यार्थिनींची ही मागणी पूर्ण करण्यासंदर्भात डॉ. फुके यांनी शासकीय आदिवासी मुलींच्या वसतीगृहाच्या गृहपाल श्रीमती शीतल मामनकर यांना सुचना दिल्यात. तसेच विद्यार्थिनींच्या वसतीगृहाची स्वच्छता सर्व उपलब्ध सोयी-सुविधा पाहून गृहपाल श्रीमती शीतल मामनकर यांची प्रशंसा केली.

आदिवासी मुलांच्या वसतीगृहामध्ये 1000 विद्यार्थ्यांची क्षमता असून सध्यस्थितीला नवीन 81 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. मागील वर्षीच्या विद्यार्थ्यांपैकी 11 विद्यार्थी वसतीगृहात राहत आहेत. आदिवासी मुलींच्या वसतीगृहामध्ये 100 विद्यार्थिनींची क्षमता असून सध्यस्थितीला 36 विद्यार्थिनी वसतीगृहात राहत असून नवीन विद्यार्थिनींच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रीया सुरु आहे.