Published On : Mon, May 28th, 2018

स्वच्छ फुटाळा मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे : दीपराज पार्डीकर

Deepraj Pardikar
नागपूर: शहरातील सर्व तलाव व जलाशये ही आपली संपत्ती आहे. त्यांचे संवर्धन व जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. म्हणूनच मनपा प्रशासनाच्या नेतृत्वात सुरू झालेले स्वच्छ फुटाळा, स्वच्छ गांधीसागर मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी केले.

सोमवारी (ता.२८) कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी फुटाळा तलावाची पाहणी केली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी दीपराज पार्डीकर यांनी प्रत्यक्ष तलावात उतरून स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. स्वच्छतेचे काम बघून समाधान व्यक्त केले. फुटाळा तलावातील जलपर्णी काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ते काम तसेच कायम सुरू ठेवावे, असे निर्देश पार्डीकर यांनी दिले. तलावाच्या परिसरातील अतिक्रमणही आता वाढणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात यावी, अशा सूचनाही कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिल्या.

काल रविवारी (ता.२७) मनपाचे आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी फुटाळा तलावाची पाहणी केली. आवश्यक त्या सूचनाही केल्या. त्यांच्या सूचनेनुसारच तलावाच्या स्वच्छेतेसंदर्भातील कार्यवाही पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले. तलावाच्या सभोवताल असलेल्या दुकानांना त्यांच्या भागातील स्वच्छतेची जबाबदारी देण्यात यावी, असेही दीपराज पार्डीकर यांनी सांगितले.

यावेळी युवराज नागपुरे, लक्ष्मण केळवदे यांच्यासह २२ जणांची चमू फुटाळा तलाव स्वच्छ मोहिमेत सहभागी आहे.