Published On : Fri, Jun 5th, 2020

राष्ट्रीय महामार्गांवरील अपघात व मनुष्य व प्राण्यांचे मृत्यू रोखणे तामिळनाडूसारखी मोहीम प्रत्येक राज्याने राबवावी : नितीन गडकरी

प्राण्यांना रस्ता ओलांडण्यासाठी महामार्गांवर ‘अंडरपास’

नागपूर: राष्ट्रीय महामार्गांवरील अपघात आणि मनुष्य व प्राण्यांचे मृत्यू ही चिंतेची बाब असून हे अपघात आणि मृत्यू रोखून मानवाचे आणि प्राण्याचे जीवन वाचविण्यासाठी राष्ट्रीय रस्ते व परिवहन मंत्रालय उपाययोजना करीत आहे. या उपाययोजनांमुळे सुमारे 30 टक्केपर्यंत अपघातात आणि मानव व प्राण्यांच्या मृत्यूत घट झाली आहे. तामिळनाडू या राज्याने जागतिक बँकेच्या सहकार्याने अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी जी मोहीम राबविली, ती मोहीम देशातील सर्व राज्यांनी राबवली पाहिजे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

Advertisement

महामार्गावरील अपघात आणि मानव व प्राण्याचे मृत्यू रोखण्यासाठी आयोजित जनजागृती मोहीमेच्या शुभारंभ प्रसंगी गडकरी नागपुरात बोलत होते. व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला. यावेळी बोलताना गडकरी यांनी सांगितले की, युनायटेड नेशन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त वतीने राष्ट्रीय महामार्गावरील अपघात आणि मानव व प्राण्यांचे मृत्यू रोखण्यासाठी एक राष्ट्रीय जनजागृती मोहीम राबविली जात आहे. दरवर्षी 5 लाख अपघात होतात, यात 1 लाख लोकांचा जीव जातो. मनुष्य आणि प्राण्यांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी उपाययोजना आखल्या जात आहेत. प्राण्यांचे मृत्यू ही गंभीर बाब आहे. प्राण्याचे जीव वाचवले जावे यासाठीच जंगलातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याखालून प्राण्यांना जाण्यासाठी रस्त्यांचे निर्माण केले जात आहे. नागपूर जबलपूर मार्गावर असे ‘अंडरपास’ तयार करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.

Advertisement

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 100 टक्के अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना करीत आहे. प्रत्येक राज्याने यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे. प्राण्यांचे आणि मानवाचे जीवन कसे वाचवले जाईल यासाठी आम्ही अनेक निर्णय घेतले आहे. देशातील राष्ट्रीय महामार्ग ज्या ठिकाणी जंगलांमधून गेले आहेत, त्या रस्त्यांवर प्राण्यांचे अपघात होऊ नये म्हणून मुख्य रस्त्याच्या खालच्या बाजूने प्राण्यांना रस्ता पार करण्यासाठी रस्ता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय रस्त्यांवरील अपघातांची ठिकाणे शोधून तेथे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना संचारबंदीच्या कालावधीत मात्र अपघाताचे प्रमाण खूप घटले आहे. पर्यावरण संरक्षण आपल्या देशासाठी आणि समाजातील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यासाठी लोकांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना पाचव्या वर्गापासूनच पर्यावरण संरक्षण, अपघातातून बचाव, प्राण्यांचे जीव वाचवणे या गोष्टीसाठी प्रशिक्षित करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

रस्त्यांवरील अपघातांवर नियंत्रण यावे यासाठी आमचे मंत्रालय अनेक उपाययोजना करीत असल्याचे सांगताना गडकरी म्हणाले- वनविभागाने मात्र आपली कार्यपध्दती बदलण्याची गरज आहे. वनविभागाच्या कार्यपध्दतीमुळे अनेक रस्त्यांचे प्रकल्प अडचणीत येतात. प्रकल्पांसाठी आवश्यक त्या परवानगी लवकर मिळत नाही. हिरवाई कमी होऊ नये असे वनविभागाचे प्रयत्न असतात. पण वनविभागांकडील मोकळ्या जागा वन विभागाने कॉर्पोरेट संस्था किंवा सामाजिक संस्थांना वृक्षारोपणासाठी दिल्या तर वनांचे क्षेत्र वाढणार आहे. या विभागाने सकारात्मक दृष्टीने विचार करावा, आमचे मंत्रालय त्यांना योग्य मदत करण्यास तयार असल्याचेही ते म्हणाले.

Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement