नागपूर: प्रत्येक नागरिक हा शासनाचा ग्राहक आहे. ग्राहकांचे हित जोपासणे हे शासनाचे प्राथमिक कर्तव्य आहे, असे मत नागपूर महानगर पालिका आणि ईलीट्स टेक्नोमिडीया प्रायव्हेट लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयजित दोन दिवसीय ईलीट्स स्मार्ट अण्ड सस्टेनेबल सिटी समिट मधील चर्चासत्रात स्मार्ट पायाभूत सुविधा आणि स्मार्ट शहरासाठी स्मार्ट घरे या विषयावर बोलतांना तज्ज्ञांनी मांडले.
या चर्चासत्रात महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, गुजरात केमीकल लि. चे व्यवस्थापकीय संचालक पी. के. गेरा, महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशीष कुमार, केसीटी ग्रुपचे अध्यक्ष सुनील दुबे, जिंदाल स्टीलचे उपाध्यक्ष सुब्रत पांडा, बालाजी आर, तसेच चर्चासत्राचे अध्यक्ष अनिल नायर आदी उपस्थित होते.
यावेळी महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, नागरिकांना उत्तम दर्जाच्या पायाभत सुविधा पुरविणे हे शासनाचे कर्तव्य असून ते पूर्ण कसे करता येईल याकडे आमचे विशेष लक्ष आहे. सध्या नागपुरातील ३० टक्के नागरिकांना पिण्याचे पाणी दुषित मिळत आहे. ३० टक्के नगरिक हे झोपडपट्टीत राहत आहेत. भविष्यात स्मार्ट रस्ते, स्मार्ट पर्यावरण, तसेच स्मार्ट पायाभूत सुविधा या नागपुरात दिसू लागतील असे ते म्हणाले.
नागपूरमध्ये मेट्रोचे काम जलदगतीने सुरू आहे. या शहरासाठी सांडपाण्याची समस्या ही शीर्षस्थानी असून त्याचे निवारण करण्याकरिता भांडेवाडी येथे सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प उभारण्यात आला आहे. असेही ते यावेळी बोलतांना म्हणाले. या चर्चासत्राला उपस्थित प्रतिनिधीनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मान्यवरांनी दिली.