मुंबई – राज्याच्या विधीमंडळाच्या प्रांगणात काल झालेल्या गोंधळावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार प्रतिक्रिया नोंदवत सत्ताधाऱ्यांवर आणि विरोधकांवरही खरमरीत शब्दांत टीका केली आहे. “विधानभवनात जर भविष्यात आमदारांचे खूनही झाले, तरी कोणीही चकित होणार नाही,” असा संतप्त इशारा त्यांनी दिला आहे.
गुरुवारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थकांमध्ये विधीमंडळाच्या लॉबीत धक्काबुक्की आणि जोरदार धुमश्चक्री घडली. या प्रकाराने संपूर्ण राजकीय वर्तुळ हादरले असून, यावर आता राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सडेतोड भूमिका मांडली आहे.
सत्ता साधन आहे, साध्य नव्हे-
“कालच्या हाणामारीचा व्हिडीओ पाहून मनात एकच प्रश्न निर्माण होतो – काय अवस्था झाली आहे आपल्या महाराष्ट्राची?” असे म्हणत राज ठाकरे यांनी सत्तेच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “सत्ता ही जनतेच्या हितासाठी असते, पण आता ती केवळ व्यक्तिगत उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी वापरली जाते,” असा आरोपही त्यांनी केला.
स्वतःच्या लोकांवर कारवाई करण्याचं धाडस ठेवा-
राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान दिलं आहे – “जर तुमच्यात थोडीशी का होईना, साधनशुचिता उरली असेल, तर तुमच्या स्वतःच्या आमदारांवर कारवाई करून दाखवा. आमच्या सैनिकांनी मराठी माणसाच्या हितासाठी आवाज उठवला, तेव्हा त्यांच्यावर कारवाई केली गेली. पण कालचा गोंधळ घालणाऱ्यांवर कोणती कारवाई होते, हे जनतेनं पाहावं.”
अधिवेशन म्हणजे खर्चाचा तमाशा?
राज ठाकरे यांनी राज्याच्या आर्थिक परिस्थितीवरूनही सरकारला लक्ष्य केलं. “अधिवेशनाचा दररोजचा खर्च दीड ते दोन कोटी रुपयांपर्यंत जातो. मात्र राज्यात विकासकामांचा बोजवारा उडालाय, कंत्राटदारांची बिलं थकली आहेत. आणि दुसरीकडे, अधिवेशनात केवळ गोंधळ, वाद आणि तमाशाच सुरू आहे,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राजकारणातला ढोंगीपणा लोकांनी ओळखावा-
“भंपक लोकांना पक्षात घेऊन दुसऱ्या पक्षांवर गलिच्छ टीका केली जाते, आणि त्यानंतर साधनशुचिता शिकवली जाते. हा ढोंगीपणा आता महाराष्ट्राच्या जनतेनं ओळखावा,” असा टोला राज ठाकरे यांनी नाव न घेता अनेक नेत्यांना लगावला.