नागपूर पदवीधर निवडणूक : उत्तर व दक्षिण नागपूर भागात झंझावाती प्रचार दौरा
नागपूर,- स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुता या आदर्श तत्त्वांवर आधारित शिक्षणप्रणाली प्रस्थापित करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. विखुरलेल्या समाजाला पुन्हा एकत्र करून त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत करणार असल्याचे नागपूर पदवीधर मतदार निवडणूकीचे सिनेट परिवर्तन पॅनेलचे उमेदवार प्रशांत डेकाटे यांनी केले आहे.
निवडणूकीच्या प्रचारार्थ प्रशांत डेकाटे यांनी नागपुरातील उत्तर व दक्षिण भागात प्रचार दौरा करून तेथील पदवीधरांची बैठक घेतली. यावेळी महेश बनसोड, शिलवंत मेश्राम, भूषण वाघमारे, सूरज तागडे, अलोक गजभिये, प्रतिक बनकर प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपूर पदवीधर मतदार संघ ही कोणाची मक्तेदारी नाही. प्रस्थापित सरकारने गेली ५० वर्षे पदवीधरांसाठी काय केले ? हा प्रश्न प्रशांत डेकाटे यांनी उपस्थितांना केला. प्रस्थापित सरकारने शिक्षणाचे बाजारीकरण व खासगीकरण करण्याचा मार्ग खुला केला आहे. वंचितांना, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कासाठी मागील काही वर्षांपासून सिनेट परिवर्तन पॅनल काम करत आहे. मी नागपूर विद्यापीठाचा सिनेट सदस्य आहे. विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठात ३०० विद्यार्थ्यांचे वसतीगृह मंजूर करून घेतले. याशिवाय ६०० विद्यार्थी एकाचवेळी बसून अभ्यास करतील असे वाचनकक्ष निर्माण करण्यासाठी मंजूरी प्रदान केली.
नागपूर विद्यापीठ पीएचडी संशोधन शिष्यवृत्ती ही ५ हजार वरून ८ हजार इतकी केली आहे. माझ्या मागणी पाठपुराव्यामुळे कमवा आणि शिका योजनेचे बजेट वाढविण्यात आले. विद्यार्थ्यांना परीक्षा फेर मुल्यांकनांचे शुल्क भऱावे लागत, ही समस्या सोडविण्यासाठी मी विद्यापीठात आवाज उठवला, आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ झाले. याशिवाय अनेक प्रश्नांना न्याय देण्याचे काम माझ्या नेतृत्वात करण्यात आले आहे. यासारख्या असंख्य समस्या व प्रश्न घेऊन विधानपरिषेद लढायचे आहे. यासाठी तुमची साथ आवश्यक आहे. त्यासाठी माझ्या नावापुढे १ क्रमांक लिहून मला बहुमताने विजयी करा, असे आवाहन प्रशांत डेकाटे यांनी केले.
प्रशांत डेकाटे यांच्या प्रचारार्थ अनेक संस्था एकत्र आल्या आहेत. अनेक संघटनांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना, ह्युमन राईट प्रोटेक्शन फोरम, भारतीय विद्यार्थी मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, नागपूर युनिव्हर्सिटी टिचर्स ऑर्गनायेशन, ऑर्गनायेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल्स, डॉ.बाबासाहेब आंबेडकर टीचर्स वेलफेअर असोसिएशन, फुले शाहू अध्यापक परिषद या संघटनेचा समावेश आहे.