शेतकर्यांशी अॅग्रोव्हिजन मार्फत ई संवाद
-तेलबियांचे उत्पादन वाढावे, मधमाशी पालन प्रकल्प
-मस्यपालन, वनौषधी प्रकल्पाला चालना
-शेतकर्याचे 30 लाख लिटर दूध घ्यावे
-धापेवाड्यात पहिले स्मार्ट व्हिलेज होणार
नागपूर: जागतिक स्तरावर कोणत्या उत्पादनाला मागणी आहे, याचा अभ्यास करून शेतकर्यांनी ते पीक घ्यावे. परंपरागत पीकापासून आता बाजूला होण्याची वेळ आली आहे. तसेच तेलबियांचे उत्पादन अधिक वाढविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करतानाच शेतकर्यांचा संपूर्ण कापूस यंदा 10 ते 15 जूनपर्यंत खरेदी झाला पाहिजे यासाठी आपले प्रयत्न असल्याचे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
शेतकर्यांशी आज दुपारी अॅग्रो व्हिजनच्या माध्यमातून ई संवाद साधताना ते बोलत होते. या संवाद कार्यक्रमात राज्याचे पशुपालन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, गडचिरोलीचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, आ. समीर मेघे, अॅग्रेा व्हिजनचे अध्यक्ष रवी बोरटकर, कोषाध्यक्ष रमेश मानकर, आ. सावरकर, सुधीर दिवे, आनंदराव राऊत, डॉ. मायी, प्रशांत वासाडे हे या संवाद कार्यक्रमात सहभागी झाले होते.
शेतकर्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे गेले पाहिजे. गहू, तांदूळ, साखर यांचा साठा देशात मुबलक आहे. यापेक्षा अधिक उत्पादन झाले तर सरकार गहू तांदळाला भाव देऊ शकणार नाही. अशावेळी आपण जागतिक बाजारपेठेत कशाची मागणी अधिक आहे, याचा अभ्यास करून त्या वस्तूचे उत्पादन घेतले पाहिजे. कापसाच्या खरेदीत अनेक समस्या आहेत, कापडाची निर्यात बंद झाली आहे. खरेदीबाबतही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. आपण आज 90 हजार कोटींचे खाद्य तेल आयात करीत असतो. सोयाबीन आपण पेरतो. पण अन्य देशांच्या तुलनेत आपल्याकडे सोयाबीनचे एकरी उत्पादन अल्प आहे. हे उत्पादन कसे वाढणार याचा अभ्यास शेतकर्यांनी केला पाहिजे. रब्बीमध्ये सूर्यफुलाची लागवड करणे महत्त्वाचे ठरणार आहे. धानाला सूर्यफुल हा पर्याय निर्माण होऊ शकतो. शेतकर्यांनी आधी आपल्या जमिनीची तपासणी केली पाहिजे. आपल्या जमिनीत काय कमी आहे, याची माहिती करून घेतली पाहिजे. ‘ऑर्गनिक कार्बन’चे प्रमाण आपल्याकडील शेतीत कमी असल्यामुळे उत्पादन कमी होते. जमिनीतील ऑर्गनिक कार्बनचे प्रमाण वाढले तर शेतकर्याच्या उत्पादनातही अडीच पटीने वाढ होऊ शकते.
गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागात मध उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. मधमाशी पालन प्रक़ल्प वाढले तर मध उत्पादन वाढणार आहे. तसेच पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मालगुजारी तलाव आहेत. या तलावात मत्स्यपालन योजनाा तयार झाली पाहिजे. ताडीमाडी प्रकल्पासाठी 500 कोटी केंद्राने मंजूर केले आहे. यातून 40 हजार लोकांना रोजगार मिळेल व नीरा विक्रीची केंद्रे जिल्हास्तरावर सुरु करता येणार आहेत. वनौषधीसाठीही केंद्राने मदत जाहीर केली आहे. या अंतर्गत मोठ्या प्रमाणात मधनिर्मिती होईल. आज मधाला मोठी मागणी आहे. मधमाशी पालन उद्योगामुळे शेतकर्याचे उत्पन्न 20 टक्क्यांनी वाढणार आहे. वनौषधीसाठी 5 लाख कोटी मिळणार आहे. यामुळे 10 लाख हेकट्र मध्ये हर्बल शेती करणे फायदेशीर ठरणार आहे.
दुग्ध उत्पादनातही आपली अजून समाधानकारक कामगिरी नाही. दुधाचे उत्पादन अजूनही वाढले नाही. विदर्भातील शेतकर्याचे 30 लाख लिटर दूध मदर डेअरीने घेतले पाहिजे. पण एवढे दूध उत्पादन होणे आवश्यक आहे. दूध पावडर, पनीर तयार झाले पाहिजे. दिवसेंदिवस डेअरीच्या उत्पादनांना अधिक मागणी येत आहे.
विदर्भातील सर्व शेतकर्यांना केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ झाला पाहिजे. 1.65 लाख कोटींचे पॅकेज शासनाने दिले आहे. या संवाद कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी शेतकर्यांसाठी दिलेल्या सर्व योजना व त्यासाठी असलेल्या निधीची माहिती दिली.
वर्धा जिल्ह्यातून आपण 70 कोटींचा भाजीपाला निर्यात करीत असल्याची माहिती सांगताना नितीन गडकरी म्हणाले- नागपुरात 10 शेतकरी बाजार सुरु झाले पाहिजे. शेतकर्यांनी या बाजारात आपला भाजीपाला आणावा व विकावा. यामुळे शेतकर्याचा मोठा फायदा होणार आहे. धापेवाडा येथे पहिले स्मार्ट व्हिलेज तयार करण्याचा मानस गडकरींनी यावेळी व्यक्त केला. एक सुंदर बंगला साडे तीन लाखांना गावकर्यांना देण्याचा विचार त्यांनी सांगितला. या सर्व विषयांना स्पर्श करतानाच सिंचनासंबंधी बोलताना त्यांनी बुलडाणा पॅटर्नचा अनुभव सांगितला. धावणारे पाणी चालले पाहिजे, चालणारे पाणी थांबले पाहिजे आणि थांबलेले पाणी मुरले पाहिजे. बुलडाणा पॅटर्नमुळे 85 टक्के गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरींना पाणी उपलब्ध झाल्याचेही त्यांनी सांगितले. एमएसएमईतर्फे 10 लाख महिलांना सोलर चरखा देणार आणि त्यांचे सूतही आम्ही घेणार आहोत. खेडे समृध्द झाले तरच शहरात झोपड्या निर्माण होणार नाहीत असेही ते म्हणाले.
पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनीही आपल्या विभागाच्या योजना आणि आवश्यक ते केंद्राची मदत मिळवून देण्याची विनंती केली. तसेच गडचिरोलीचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही या सर्व योजनांचा शेतकर्यांना लाभ होईल यासाठी आपण प्रयत्न करू वेळ प्रसंगी केंद्राची मदतही घेऊ. पक्षभेद विसरून काम करू असेही ते म्हणाले. संवाद कार्यक्रमाचे संचालन डॉ. मायी यांनी तर आभार रवी बोरटकर यांनी मानले.
