Published On : Mon, Mar 1st, 2021

नानाजी देशमुख यांचे स्वप्न साकार करण्यासाठी शेतकरी आणि गावे समृध्द करणे हाच आत्मनिर्भरतेचा मार्ग: ना. नितीन गडकरी

दीनदयाल शोध संस्थानच्या हर्बल क्लस्टरचा शुभारंभ

नागपूर: दीनदयाल शोध संस्थानचे संस्थापक स्व. नानाजी देशमुख, पं. दीनदयाल उपाध्याय आणि म. गांधी यांची आत्मनिर्भर भारताची संकल्पना साकार करायची असेल तर देशातील शेतकरी आणि गावे सुखी, संपन्न व समृध्द करणे हाच आत्मनिर्भरतेचा मार्ग असल्याचे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

स्फूर्ती योजनेअंतर्गत दीनदयाल शोध संस्थानच्या हर्बल क्लस्टरचा शुभारंभ करताना ना. गडकरी बोलत होते. याप्रसंगी रा. स्व. संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी, मदनदासजी या आभासी कार्यक्रमाला उपस्थित होते. याप्रसंगी ना. गडकरी पुढे म्हणाले- या हर्बल क्लस्टरमुळे अनेक लोकांना रोजगार मिळेल. पण विविध उद्योगांच्या 100 क्लस्टरची निर्मिती दीनदयाल शोध संस्थानने करावी. यासाठी माझ्याकडे प्रस्ताव पाठवा. स्फूर्ती या योजनेत 500 हस्तकलाकार आणि 500 पेक्षा अधिक हस्त कलाकार असे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात आम्ही क्लस्टरला 2.5 कोटी तर 500 पेक्षा अधिक हस्तकलाकार असलेल्या क्लस्टरला 5 कोटी रुपयांची मदत देतो, असेही ते म्हणाले.

स्व. नानाजी हे ग्रामविकासाला समर्पित होते, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- म. गांधी, दीनदयालजी यांनी अधिक लोकांच्या सहभागाने अधिक उत्पादनाची गरज असल्याचे सांगितले. ही त्यांच्या अर्थनीतीची प्राथमिक संकल्पना आहे. या संकल्पनेवर आधारित आत्मनिर्भर भारताची संकल्पना घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुढे जात आहोत. या संकल्पनेनुसार स्मार्ट सिटी प्रमाणे स्मार्ट व्हिलेज आम्हाला बनवावे लागतील. गावांमध्ये स्वच्छता, आरोग्याची सोयी सुविधा, शौचालये, चांगली मैदाने, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, शेतकर्‍याला सिंचनासाठी पाणी, या सुविधा उपलब्ध कराव्या लागतील, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

शेतकर्‍यांनी जैविक खतांचा वापर करून आपले उत्पादन वाढवावे. याशिवाय शेतकरी जैविक इंधन निर्मितीही करू शकतात. यासाठी लागणारा कच्चा माल शेतकर्‍यांकडेच उपलब्ध आहे.

फक्त नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून हे शक्य असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- गावाच्या विकासासाठी आणि ग्रामीण उद्योग क्षेत्राचे सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढविण्यासाठी प्रत्येक गावात 2 उद्योग सुरु व्हावेत. त्यासाठी आपण मदत करू. यामुळे ग्रामीण, कृषी, आदिवासी आणि जंगल क्षेत्रातील लोकांना आपल्या पायावर आपण उभे करू शकू. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी गावांचा समग्र विकास व्हावा हेच नानाजींचे स्वप्न होते. त्यांचे स्वप्न पूर्ण करणे म्हणजे आत्मनिर्भर भारताकडे गतीने जाण्यासारखे आहे, असेही ना. गडकरी म्हणाले.