एफआयसीसीआय पदाधिकार्यांशी संवाद
नागपूर: कोविड-19 चा देशातील सर्वच क्षेत्रावर विपरित परिणाम झाला असून सर्वच उद्योगांना फटका बसला आहे. याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला. असे असतानाही केंद्र शासनाने मात्र या क्षेत्राला दिलासा मिळेल असे निर्णय घेतले. प्रवास, पर्यटन आणि आदरातिथ्य या क्षेत्रात रोजगाराची खूप क्षमता आहे. प्रचंड रोजगार निर्मिती करणारे हे क्षेत्र असल्याचे केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले.
एफआयसीसीआयच्या पदाधिकार्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. याप्रसंगी ना. गडकरी पुढे म्हणाले- कोविडचा भारतीय आणि परकीय पर्यटक आणि प्रवासी वाहनांवर चांगला परिणाम झाला नाही. याच काळात सकारात्मकता आणि आत्मविश्वासाची गरज देशाला होती. समाजासमोर आर्थिक अडचण निर्माण झाली. सरकारही आर्थिक अडचणीतूनच प्रवास करीत होती. आता प्रतिबंधात्मक लस निर्माण झाली असून सहा महिने ते वर्षभराच्या काळात परिस्थिती सामान्य होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या क्षेत्रात विकासाच्या खूप क्षमता असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- नवीन तंत्रज्ञान आणि संशोधनाचा वापर करून पुढे जावे लागणार आहे. पेट्रोल डिझेलला पर्याय म्हणून इलेक्ट्रिकवर चालणारी वाहने आली आहेत. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आता चारधाम रोड बांधत आहे. या रस्त्यांच्या शेजारी नवीन हॉटेल, रेस्टॉरंट सुरु करण्याची नवीन रचना आम्ही आखत आहोत. स्मार्ट, गावे या रस्त्यांशेजारी निर्माण करण्याचेही प्रयत्न आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. आमची अर्थव्यवस्थे ही गतीने पुढे जाणारी आहे. हे क्षेत्र अधिक रोजगार निर्मिती करणारे असल्यामुळे आत्मनिर्भर भारत या संकल्पनेत या क्षेत्राचा महत्त्वाचा सहभाग राहणार आहे, असेही ते म्हणाले.
https://www.facebook.com/watch/?v=1130451897383764
नागपुरात ब्रॉडगेज मेट्रो आम्ही सुरु करणार असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- नागपूरच्या सभोवताली सुमारे 250 किमीच्या परिघात ही मेट्रो मुंबई कलकत्ता आणि चेन्नई मार्गावरच चालणार आहे. ही मेट्रोही उद्योजकच चालविणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. परकीय गुंतवणूकदारही आपल्या देशात गुंतवणुकीस तयार आहेत. त्यांना विश्वासार्हता मिळाली तर तेही आकर्षित होतील. देशात प्रत्येक क्षेत्रात गुंतवणुकीसाठ़ी मोठा वाव आहे. नावीण्य, नवीन संशोधन, तंत्रज्ञान याचा उपयोग प्रत्येक क्षेत्रात व्हावा याकडेही ना. गडकरी यांनी लक्ष वेधले.