Published On : Thu, Nov 11th, 2021
By Nagpur Today Nagpur News

‘साई’च्या जागेवरील अतिक्रमणधारकांचे होणार पूनर्वसन

Advertisement

दिल्ली येथे ना.नितीन गडकरी व केंद्रीय क्रीडा मंत्री ना.अनुराग ठाकुर यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

नागपूर : नागपूर शहरात प्रस्तावित स्पोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ इंडिया (साई)च्या जागेवर असलेल्या अतिक्रमणधारकांचे जवळच्याच ७ एकर जागेमध्ये पूनर्वसन करण्यात येणार आहे. यासंबंधी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांच्या उपस्थितीत विशेष बैठक घेण्यात आली.

Gold Rate
28 July 2025
Gold 24 KT 98,500 /-
Gold 22 KT 91,600 /-
Silver/Kg 1,13,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी, आमदार सर्वश्री प्रवीण दटके, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी, मनपाचे अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, मनपाचे क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, द्रोणाचार्य व अर्जुन पुरस्कार प्राप्त विजय मुनिश्वर आदी उपस्थित होते.

यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी ‘साई’च्या कामातील अडथळे दूर करून या कामाला गती देण्याबाबत केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांच्याकडे विनंती केली. नागपूर शहरातील वाठोडा भागामध्ये ८४ एकर जागेमध्ये ‘साई’चे केंद्र प्रस्तावित आहे. मात्र या जागेवर अतिक्रमण असल्याने येथील काम होउ शकले नाही. ‘साई’च्या संपूर्ण जागेवर सुरक्षा भिंत तयार करण्यासाठी केंद्र शासनाद्वारे निधी उपलब्ध झाला मात्र अतिक्रमणामुळे ते सुद्धा काम होउ शकले नाही. यासंदर्भात नागपूर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये अतिक्रमणधारकांच्या पूनर्वसनासंदर्भात प्रस्ताव पारीत करण्यात आला. पूनर्वसनासंदर्भात वृत्तपत्रामधून नोटिफिकेशनद्वारे पात्र लाभार्थ्यांकडून कागदपत्रे मागविण्यात आले होते. त्यानंतर ६४७ नागरिकांनी कागदपत्रे जमा केली. ६४७ नागरिकांपैकी काहींनी पक्के घर तर काहींनी खुले भूखंड अतिक्रमण केले आहे. हे सर्व अतिक्रमण नागपूर महानगरपालिका, एनएमआरडीए आणि नागपूर सुधार प्रन्यासद्वारे काढण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह मनपा व नासुप्र प्रशासनाद्वारे बैठकीत सादर करण्यात आली.

भारत सरकारद्वारे ‘साई’च्या जागेमध्ये भिंतीसह वसतीगृह आणि अत्याधुनिक इनडोअर सभागृहाकरिता निधी आवंटित करण्यात आल्याची माहिती यावेळी विषय सचिवाद्वांरे देण्यात आली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘साई’चे बांधकाम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी एकीकृत प्लान तयार करण्याची सूचना केली. एकीकृत प्लान तयार करून त्यानंतर केंद्र शासनाचा निधी आणि सीएसआर निधीमधून विकास करण्याचे त्यांनी सांगितले. ‘साई’च्या जागेवरील भिंतीच्या कामासाठी नेमण्यात आलेल्या कंपनीचे नागपूरला कार्यालय नाही शिवाय ‘साई’चे सुद्धा कार्यालय औरंगाबादमध्ये आहे. दोन्ही बाहेरील असल्याने या कार्याला गती मिळत नाही. त्यामुळे अत्याधुनिक सभागृह, वसतीगृह आणि भिंतीच्या कामासाठी नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी. त्यामध्ये केंद्राच्या क्रीडा कंपनीऐवजी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा नागपूर सुधार प्रन्यासद्वारे काम करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे निर्देश ना.नितीन गडकरी यांनी दिले. स्थानिक संस्थेद्वारे काम करण्यात आल्यास कामामध्ये गतीशीलता येईल, असेही ते म्हणाले.

‘साई’च्या संपूर्ण कार्यासंदर्भातील अडचणींबाबत सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचा विश्वास केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांनी व्यक्त केला. मनपाने सदर जागेवरील अतिक्रमण लवकरात लवकर हटवून निविदा प्रक्रियेद्वारे पुढील कार्यवाही सुरू करण्याचेही त्यांनी निर्देश दिले.

Advertisement
Advertisement