Published On : Sun, Aug 13th, 2017

इंडोयूके हेल्थ मेडीसिटीमुळे मिळणार दोन लाख युवकांना रोजगार- मुख्यमंत्री

 
  • देशातील पहिल्या मेडिसिटीची स्थापना नागपूरमध्ये
  • नागपूरची ‘मेडिकल हब’कडे वाटचाल
  • मेडीसिटीमुळे नागपूरात मोठी गुंतवणूक


नागपूर:
‘इंडोयूके इन्सिटट्यूट ऑफ हेल्थ मेडीसिटी’मुळे नागपूरची “हेल्थ टुरिजम”कडे वाटचाल सुरु झाली आहे. देशामध्ये सर्वप्रथम नागपूर येथे इंडोयूके इन्सिटट्यूट ऑफ हेल्थच्या पहिल्या मेडीसिटीची स्थापना मिहान येथे आज करण्यात येत आहे. मेडीसिटीचे काम तीन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. तीनही टप्पे कार्यान्वित झाल्यानंतर मेडिसीटीत दोन लाख युवकांना रोजगार प्राप्त होईल. मेडीसिटीच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानयुक्त वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामुळे नागपूरची ओळख ‘टायगर कॅपिटल’ सोबतच ‘हेल्थ केअर हब’ म्हणून होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

वर्धा रोडवरील लि-मेरीडीयन हॉटेल येथे आज इंडोयूके इन्सिटट्यूट ऑफ हेल्थ अर्थात आययूआयएस (IUIH) च्या पहिल्या मेडीसिटीच्या कोनशीलेचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

महापौर श्रीमती नंदा जिचकार, खासदार अजय संचेती, कृपाल तुमाने, सर्वश्री आमदार सुधाकर देशमुख, आशिष देशमुख, प्रकाश गजभिये, सुधाकर कोहळे, विभागीय आयुक्त अनूप कुमार, इंडोयूके इन्सिटट्यूट ऑफ हेल्थ मेडीसिटीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अजय राजन गुप्ता, ब्रिटीश हाय कमिशन इंडियाच्या उपसंचालक श्रीमती जेन ग्रेडी, मिहान सेझचे विकास आयुक्त एस.के.शर्मा, सुरेश कांकाणी यावेळी उपस्थित होते.

भारतामध्ये सर्वप्रथम नागपूर येथे मेडीसिटीची स्थापना करण्यात आली आहे, हा ऐतिहासिक क्षण आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोव्हेंबर 2015 मधील ब्रिटन दौऱ्यामध्ये करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनामध्ये इंडोयूके इन्सिटट्यूट ऑफ हेल्थ मेडीसिटी या उपक्रमाची घोषणा करण्यात आली होती. यानुसार भारतात अशा प्रकारच्या अकरा नवीन भारत-ब्रिटन आरोग्य प्रतिष्ठाने स्थापना करण्याचा प्रस्ताव होता. त्यानुसार नागपूर येथे देशातील पहिल्या मेडीसिटीची स्थापना करण्यात येत आहे. यामुळे नागपूरची वाटचाल आता हेल्थ टुरिजमकडे होत आहे. नागपूर हे देशाचे मध्यवर्ती केंद्र असल्यामुळे अनेकांना उपचार घेण्यासाठी नागपूर हे ठिकाण सोयीचे आहे. येथेच आता एम्सची देखील लवकरच निर्मिती होणार आहे. एम्ससोबतच मिहानमध्ये मेडीसिटीची स्थापना झाल्यामुळे ‘इंटरनॅशनल मेडिकल हब’ म्हणून नागपूरची ओळख होणार आहे.


मेडीसिटीचा पहिला टप्पा सन 2019 पर्यंत पूर्ण होणार असून तीन टप्प्यात मेडीसिटीचे काम पूर्णत्वास जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सर्व टप्पे कार्यान्वित झाल्यानंतर दोन लाख लोकांना रोजगार प्राप्त होईल, असेही ते म्हणाले. मेडीसिटीमुळे आता ‘मेक इन नागपूर मेडिकल हब’कडे वाटचाल करणार आहे. मेडीसिटीमध्ये रुग्णांसाठी हजार खाटांचे रुग्णालय तर बांधण्यात येणारच आहे शिवाय मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज तसेच रुग्णांना विविध क्रीडा प्रकार, प्राणायम, योगा यांच्या माध्यमातून सुविधा पुरविण्यात येणार आहे. वैद्यकीय सुविधेतील अशा प्रकारचा प्रयत्न पहिल्यांदाच होत असून ही बाब निश्चितच स्पृहणीय आहे, असे ते म्हणाले.


इंडोयूके इन्सिटट्यूट ऑफ हेल्थ मेडीसिटीचे व्यवस्थापक डॉ. अजय राजन गुप्ता म्हणाले की, इंडोयूके इन्सिटट्यूट ऑफ हेल्थ मेडीसिटीच्या माध्यमातून रुग्णांना अत्याधुनिक सोयी सुविधा, योग्य उपचार माफक दरात पुरविण्यात येणार आहेत. याच धर्तीवर संपूर्ण देशात इंडोयूके इन्सिटट्यूट ऑफ हेल्थ मेडीसिटी आणि आययूआयएच क्लिनिक्स विकसित केली जाणार आहे. प्रत्येक मेडीसिटीमध्ये हजार खाटांचे रुग्णालय असणार आहे. ब्रिटन मधील राष्ट्रीय आरोग्य सेवा संस्थांच्या मदतीने हे रुग्णालय चालविले जातील. ग्रेट ब्रिटनमधील राष्ट्रीय आरोग्य सेवा ही जगातील सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवा समजली जाते. या रुग्णालयाखेरीज उपचार विषयक व प्रशिक्षण विषयक मार्गदर्शन केल्या जाईल. संशोधन, शिक्षण, तंत्रज्ञान, उत्पादन आणि आरोग्य सेवा यांच्यातील जागतिक दर्जाच्या संस्थांच्या सहकार्याने देशात एकात्मिक आरोग्य सेवा पूर्ण करण्याचा ब्रिटन आणि भारत या दोन्ही देशाचा मानस आहे, असे ते म्हणाले. यावेळी ब्रिटीश हाय कमिशन इंडियाच्या उपसंचालक श्रीमती जेन ग्रेडी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

आययूआयएच ची पहिली मेडीसिटी देशात सर्वप्रथम नागपूर येथे स्थापन केली जात असून 1600 कोटी रुपयाची गुंतवणूक असलेली ही मेडीसिटी लंडन मधील किंग्ज कॉलेज हॉस्पिटलच्या सहकार्यानी विकसित केली जाणार आहे. मिहान सेझमध्ये 151 एकर जागेमध्ये मेडीसिटी उभारल्या जाणार आहे. भारत सरकारचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उद्योग मंत्रालयातील औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाने पुरस्कृत केलेल्या इन्व्हेस्ट इंडिया या राष्ट्रीय गुंतवणूक प्रोत्साहन व मदत एजन्सीचे पाठबळ या प्रकल्पाला लाभले आहे. भारत आणि ब्रिटन या दोन्ही देशांनी सन 2013 साली सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. तेव्हापासून दोन्ही राष्ट्रे एका संयुक्त कार्यकारी गटाच्या माध्यमातून आरोग्य शिक्षण आणि प्रशिक्षण या क्षेत्रात एकत्रित काम करत आहेत. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती पूनम कुकरेजा यांनी तर आभार डॉ.राजदीप सिंग चिन्ना यांनी मानले.