Published On : Sun, Aug 13th, 2017

कर्करुग्णांना किफायतशीर दरात उपचार देणे शक्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Advertisement


नागपूर:
देशभरातील कर्करुग्णांना अत्यंत किफायतशीर दरात सेवाभावाने उपचार देणे नॅशनल कॅन्सर इस्टिट्यूटच्या (एनसीआय) माध्यमातून नक्कीच शक्य होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

जामठा येथे अत्याधुनिक सुविधांनी युक्त राष्ट्रीय कॅन्सर संस्थेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन आज झाले. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा, केंद्रीय कोळसा व नविकरणीय ऊर्जामंत्री पियूष गोयल, पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अजय संचेती, खासदार कृपाल तुमाने, दिलीप सांघवी, संजीव पुरी, राणा कपूर, टाटा मेमोरियल ट्रस्टचे डॉ.कैलास शर्मा, डॉ.आशा कापडीया, अमृता फडणवीस व अन्य मान्यवर उपस्थित होते. शैलेंद्र जोगळेकर, डॉ.आनंद पाठक, ॲड. सुनिल मनोहर, आनंद औरंगाबादकर यांनी स्वागत केले.

यावेळी रेडिएशन आँकोलॉजी, रेडियो डायग्नोस्टीक या वैद्यकीय सुविधांचे तसेच पिण्याचे शुद्ध पाणी पुरविणाऱ्या उपकरणाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. रुग्णांसाठीच्या ‘सेल्फ केअर कीट’चे विमोचन मान्यवरांनी केले. ‘एनसीआय’च्या संकेतस्थळाचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गरिबांसाठी कर्करोगावरील उपचार किफायतशीर दरात देण्यावर भर देणे गरजेचे असून यासाठी देशातील विविध दानशूर समाजसेवी संस्थांनी पुढे यावे. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची उभारणी हा ऐतिहासिक दिवस आहे. कर्करोगावरील उपचारांसाठी रुग्णांना अत्याधुनिक सुविधा मिळणे गरजेचे असून नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून नागपूर आणि मध्य भारतातील रुग्णांसाठी ही सुविधा उपलब्ध होत आहे. ‘एनसीआय’मध्ये कर्करुग्णांना सेवाभावातूनच उपचार देण्यावर भर देण्यात येईल. कर्करोगावरील उपचारांसाठी सर्वोत्तम असे तंत्रज्ञान ‘एनसीआय’मध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहे. कर्करोगावरील उपचारांसाठी देशभरातून रुग्ण मुंबई किंवा अन्य मोठ्या शहरात जातात. अशावेळी रुग्णांच्या नातेवाईकांच्या निवासाची सोय होणेही गरजेचे असते. कर्करोगावरील उपचार अनेक वर्ष करावे लागतात. यादरम्यान रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची सुविधाही मिळणे गरजेचे असते. अशा निवासाची सुविधाही ‘एनसीआय’ येथे करण्यात येत आहे.

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी म्हणाले, कर्करोगावरील उपचारांचे मोठे आव्हान उभे आहे. कर्करोगावरील उपचारांसाठी नागपूर आणि मध्य भारतातील रुग्णांना आता उपचारांसाठी मुंबई गाठावी लागणार नाही. ‘एनसीआय’च्या माध्यमातून नागपुरातच हे उपचार होतील. कर्करुग्णांच्या उपचारांबरोबरच नातेवाईकांच्या निवासाची व्यवस्थाही महत्वपूर्ण असते. या दृष्टीकोनातूनच मुंबईत पोर्ट ट्रस्टच्या तीन इमारती कर्करुग्णांसाठी धर्मादाय रुग्णालयाला देण्यात आल्या आहेत. याद्वारे कर्करुग्णांना उपचार देण्यात येतात. ‘एनसीआय’च्या माध्यमातून डॉ.आबाजी थत्ते यांच्या स्मृतीचे जतन होत आहे हे उल्लेखनीय असल्याचे श्री. गडकरी यांनी नमूद केले. दर्जेदार आरोग्य सेवा जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी खासगी, धर्मादाय संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही श्री.गडकरी यांनी यावेळी केले.

टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा म्हणाले, कर्करोग हा तसा असाध्य रोग आहे. समाजातील कोणत्याही स्तरातील व्यक्तीला कर्करोग होऊ शकतो. मात्र कर्करोगाचे त्वरीत निदान होणे खूप गरजेचे असते. नागपूरमध्ये ‘एनसीआय’च्या माध्यमातून कर्करुग्णांसाठी सुरु होत असलेल्या आरोग्य सेवा नक्कीच उपयुक्त ठरतील. कर्करोगावरील उपचार गरिबांसाठी किफायतशीर दरात उपलब्ध करुन देणे गरजेचे असून टाटा ट्रस्ट या कामी नक्कीच सहकार्य करत राहील, अशी ग्वाही श्री. टाटा यांनी दिली. ‘एनसीआय’ येथे उपलब्ध सोयी-सुविधा अत्यंत दर्जेदार आहेत, हे त्यांनी नमूद केले.

केंद्रीय कोळसा व नविकरणीय ऊर्जामंत्री पियूष गोयल म्हणाले, ‘एनसीआय’च्या माध्यमातून नागपूर आणि मध्य भारतातील रुग्णांसाठी कर्करोगावरील उपचारांसाठी दर्जेदार सेवा, सुविधा उपलब्ध झाली असल्याने या भागातील रुग्णांना आता मुंबई किंवा अन्य दूरच्या शहरात जाण्याची आवश्यकता भासणार नाही.

पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान म्हणाले, दर्जेदार आरोग्य सेवांची उभारणी होणे काळाची गरज असून यासाठी सामाजिक हातभार लागणेही महत्वाचे आहे. ‘एनसीआय’च्या माध्यमातून कर्करुग्णांना अत्याधुनिक उपचार नक्कीच मिळतील.

डॉ. आनंद पाठक म्हणाले, वीस वर्षापूर्वी ‘एनसीआय’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. कर्करोगावरील उपचारासाठी रुग्णांची होणारी परवड थांबविण्याच्या हेतूने हे केंद्र सुरु झाले.

टाटा मेमोरियल ट्रस्टचे डॉ.कैलास शर्मा म्हणाले, कर्करोगाचा सामना करण्यासाठी अनेकविध उपचारांची व तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. कर्करोगावरील उपचारांच्या सेवा-सुविधांचे विकेंद्रीकरण करण्याच्यादृष्टीने ‘एनसीआय’ची निर्मिती महत्वपूर्ण ठरेल.