Published On : Sun, Sep 27th, 2020

मनपा आयुक्तांनी दिला आरोग्य सुविधा सुदृढ करण्यावर भर

पदभार स्वीकारण्यास एक महिना पूर्ण : मृत्यूसंख्या कमी करण्याचे लक्ष्य

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारण्यास सोमवारी (ता. २८) एक महिना पूर्ण होत आहे. नागपुरात एकीकडे कोव्हिड रुग्णांची आणि त्यामुळे होणाऱ्या मृतांची संख्या वाढत असतानाच त्यांनी स्वीकारलेला कार्यभार त्यांच्यासाठी मोठे आव्हान होते. मात्र, एक महिन्याच्या काळात त्यांनी कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न, घेतलेले निर्णय आणि त्याला आता मिळू लागलेले यश यामुळे त्यांच्या कार्याचे आणि एकूणच कार्यशैलीचे कौतुक होऊ लागले आहे.

पदभार स्वीकारल्यानंतरच्या केवळ एक महिन्याच्या काळात नागपूर शहरातील आरोग्य सोयी सुदृढ करण्यावर त्यांनी भर दिला आहे. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच रुग्णालयातील खाटांची संख्या वाढावी यासाठी त्यांनी आपला मोर्चा खासगी रुग्णालयांकडे वळविला. खासगी रुग्णालयांतील खाटांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु केला. खाटांची संख्या वाढविणे, चाचणी वाढविणे, ॲम्बुलन्स, शववाहिकांची संख्या वाढविणे आणि कुठलाही त्रास न होता नागरिकांना आरोग्य सेवा तातडीने मिळणे यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पदभार घेतला तेव्हा रुग्णांची आणि मृतकांची संख्या सतत वाढत चालली होती. रुग्णांसाठी खासगी रुग्णालयात गरज असलेल्या रुग्णांना बेड उपलब्ध न होणे, या तक्रारींवर त्यांनी लक्ष दिले. पूर्वी केवळ सात खासगी रुग्णालयात 300 च्या जवळपास बेड्स होते. आता शहरातील एकूण ५३ रुग्णालये नागरिकांच्या सेवेत उपलब्ध आहेत. हे त्यांनी केलेल्या सकारात्मक प्रयत्नांचे यश आहे. या ५३ रुग्णालयांमध्ये सहा शासकीय आणि ४७ खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये १५१४ आणि खासगी रुग्णालयांमध्ये १९२२ बेड्स असे एकूण ३४३६ बेड्स शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी उपलब्ध झाले आहेत. या सर्व ५३ रुग्णालयांमध्ये कोव्हिड रुग्णांवर उपचार सुरू असून येथे बेड्सच्या उपलब्धतेनुसार अतिजोखमीच्या रुग्णांना भरती केले जात आहे.

शहरात कोव्हिडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांच्या सुविधेकरिता नागपूर महानगरपालिकेच्या प्रयत्नाने महापौर संदीप जोशी यांच्या मार्गदर्शनात आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्वात अनेक महत्त्वाचे कार्य करण्यात आले आहेत. कोरोबाधित रुग्णांना रुग्णालयांमधील बेड्सची वर्तमानस्थिती लक्षात यावी यासाठी केंद्रीय नियंत्रण कक्ष क्रमांक जारी करण्यात आला आहे. ०७१२ – २५६७०२१ या क्रमांकावर फोन करून रुग्णांना शहरातील रुग्णालयातील बेड्सची उपलब्धता जाणून घेता येत आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी केंद्रीय नियंत्रण कक्ष क्रमांकाच्या १० लाईन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. नागरिकांना गरजेच्या वेळी अचूक माहिती मिळावी, त्यांची भटकंती होउ नये यासाठी मनपातर्फे ‘डॅशबोर्ड’ सुद्धा तयार करण्यात आले असून यामध्ये सर्व खाजगी रुग्णालयांद्वारे त्यांच्याकडील बेड्सची ‘रियल टाईम’ माहिती अपडेट केली जाते. खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना येणा-या अडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक खासगी रुग्णालयांमध्ये एक ‘कोरोना मित्र’ नियुक्त करण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयांसंदर्भात कुठलिही तक्रार नागरिकांना असल्यास त्याची माहिती त्वरित ‘कोरोना मित्रा’ला देण्यात यावी, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे. अगोदर मनपा पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रशासन कामे करायचा. आता आयुक्तांनी पदाधिकाऱ्यांना सोबत घेउन काम करण्याची सुरुवात केली आहे, त्याचे चांगले परिणाम दिसत आहे. उच्च न्यालायलाने महापौर श्री संदीप जोशी यांच्या नेतृत्वात एक समिती नियुक्त केली आहे आणि या समितीने कोव्हिड रुग्णांसाठी खाटांची व्यवस्था करण्यासाठी सुनावणी घेतली.

आयुक्तांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी 22 ऑगस्टला नागपूर शहरात कोव्हिडमुळे झालेल्या मृत्यूची संख्या 591 मृत्यू झाले होते. पॉझिटिव्ह रुग्ण 17768 होते, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 8183 होती. शनिवारी 26 सप्टेंबर पर्यंत 59150 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तसेच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 45653 पर्यंत पोहचली आहे. मृतांची संख्या 1999 झाली आहे. आयुक्त दररोज मृतांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. मनपा आरोग्य विभागाने पाच रुग्णालय तयार केले होते पण तिथे डॉक्टर, परिचारिकांची नियुक्ती नव्हती. आयुक्तांनी यासाठी विशेष प्रयत्न केले आणि डॉक्टरांना, नर्सिंग स्टाफ ला अपेक्षे पेक्षा जास्त वेतन देण्याचा निर्णय घेतला. पांचपावली प्रसूती केंद्रामध्ये पॉझिटीव्ह महिलेची प्रसूती करण्याची सुरुवात केली.

शहरातील महत्वाच्या आरोग्य सुविधा सुधारण्याच्या दृष्टीने मनपाचे प्रयत्न सुरू आहेत. शहरातील सद्या ४२ खासगी रुग्णालयांमध्ये कोव्हिड रुग्णांचे उपचार सुरू आहेत. इतरही रुग्णालयांमध्ये सेवा सुरू करण्याबाबत कार्य सुरू आहे. खासगी रुग्णालयांकडून काढण्यात येणा-या देयकाचे बिलाचे ऑडिट (अंकेक्षण) करण्यासाठी ऑडिटर (अंकेक्षक) नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय प्रत्येक झोनमध्ये प्रत्येकी ५ रुग्णवाहिका यासह एकूण ६५ रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत आहेत. यामुळे रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. शहरात दररोज ६५०० ते ७ हजार कोव्हिड चाचण्या केल्या जात आहेत. यामध्ये आणखी आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये येत असलेल्या त्रुट्यांमुळे मध्यंतरीच्या काळात अनेक अडचणी येत होत्या. त्याकडे कटाक्षाने लक्ष देऊन आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरळीत करण्यात आले आहे. मनपाची रुग्णालये सज्ज असून वैद्यकीय कर्मचा-यांच्या अभावी ते सुरू करण्यास अडचण होती. यावरही उपाय शोधण्यात आले आहेत. रेल्वेने काही दिवसांपूर्वीच मनपाला रुग्णालय देण्याचे जाहिर केले होते. मात्र तांत्रिक अडचणीमुळे काही दिवस ते रुग्णालय सुरू न करता येऊ शकल्याने तेथील वैद्यकीय चमू मनपाच्या सदर येथील आयुष रुग्णालयात सेवा देणार आहे. त्यामुळे मनपाच्या सदर येथील रुग्णालयात कोव्हिड उपचार केले जाईल. याशिवाय मनपाच्या आयसोलेशन हॉस्पिटलची जबाबदारी शहरातील साई मंदिर ट्रस्टने घेतली आहे. इंदिरा गांधी रुग्णालयातही उपचार सुरू करण्यात आले आहे. पाचपावली रुग्णालयात कोव्हिड पॉझिटिव्ह गरोदर मातांवर उपचार व त्यांची प्रसूती सुरू करण्यात आली आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथील शिक्षण पूर्ण झालेले ६० डॉक्टर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) येथून शिक्षण पूर्ण केलेल्या २०० डॉक्टरांना लवकरच नियुक्ती देण्यात येत आहे. त्यामुळे महत्वाचा वैद्यकीय कर्मचा-यांचा प्रश्न सुटला आहे. सप्टेंबर महिन्याअखेरीस मनपाकडे मनपा रुग्णालयांचे ४०० बेड्स उपलब्ध होतील. दरम्यान, राज्य शासनाने कोव्हिड रुग्णांची माहिती जलदगतीने मिळावी आणि लोकसहभागातून हे साध्य व्हावे यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम १५ सप्टेंबरपासून हाती घेतली. नागपुरात या मोहिमेचे कामही आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्वात युद्ध पातळीवर सुरू आहे. आरोग्य सेवा सुदृढ करण्याच्या या कार्यात आयुक्तांच्या नेतृत्वात अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाने यांच्यासह आरोग्य विभागाची संपूर्ण चमू कार्यरत आहे.

प्रत्येक झोनमध्ये ५ रुग्णवाहिका
कोव्हिड संदर्भात नागरिकांना जलद प्रतिसाद मिळून त्यांना सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी मनपातर्फे कार्यवाही करण्यात आली आहे. त्याद्वारे झोनस्तरावर यंत्रणा बळकट करण्याचे कार्य करण्यात आले. अतिजोखमीच्या कोरोनाबाधित रुग्णाला जलद उपचार घेता यावे यासाठी त्याच्या जवळच्या भागातून रुग्णवाहिका उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी झोनस्तरावर उपाययोजना करण्यात आल्या आहे. मनपाद्वारे एकूण ६५ रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली असून त्यामधून प्रत्येक झोनला प्रत्येकी ५ रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहे. यासाठी झोनस्तरावर नियंत्रण कक्षही स्थापित करण्यात आले आहे.

झोनस्तरावर नियंत्रण कक्ष
कोरोनावर प्रभावी नियंत्रण करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेद्वारे क्षेत्रीय स्तरावर कोव्हिड नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. कोरोनासाठी अधिकच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी व पर्यवेक्षणासाठी संबंधित झोनचे सहाय्यक आयुक्तांना कोव्हिड नियंत्रण कक्षाचे नोडल ऑफिसर नियुक्त केले आहे. गृह विलगीकरणात असलेल्या किंवा अतिजोखमीच्या रुग्णांना कोणताही त्रास होत असल्यास नागरिकांनी त्वरीत संबंधित झोनच्या नियंत्रण कक्षामध्ये संपर्क साधावे.

झोनस्तरीय कोरोना नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक

अ.क्र. झोन कार्यालयाचे नाव संपर्क क्रमांक

१ लक्ष्मीनगर झोन क्र.०१ 0712 – 2245053

२ धरमपेठ झोन क्र.०२ 0712 – 2567056

३ हनुमाननगर झोन क्र.०३ 0712 – 2755589

४ धंतोली झोन क्र.०४ 0712 – 2465599

५ नेहरुनगर झोन क्र.०५ 0712 – 2702126

६ गांधीबाग झोन क्र.०६ 0712 – 2739832

७ सतरंजीपूरा झोन क्र.०७ मो.नं.7030577650

८ लकडगंज झोन क्र.०८ 0712 – 2737599

९ आशीनगर झोन क्र.०९ 0712 – 2655605

१० मंगळवारी झोन क्र.१० 0712 – 2599905

११ केंद्रीय नियंत्रण कक्ष 0712 – 2567021