Published On : Wed, Aug 21st, 2019

उदयोन्मुख फुटबॉल खेळाडूंना मिळाले व्यासपीठ

Advertisement

माजी महापौर प्रविण दटके यांचे प्रतिपादन

आई कुसुम सहारे स्मृती विदर्भस्तरीय फुटबॉल स्पर्धेचा समारोप

नागपूर : गेल्या पंधरा वर्षांपासून रेशीमबाग मैदानावर आई कुसूम सहारे फाऊंडेशनच्या माध्यमातून विदर्भस्तरावरील फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. फुटबॉल स्पर्धेच्या माध्यमातून विदर्भातील खेळाडूंना मोठी संधी निर्माण करून देण्याचे कार्य आयोजक व आरोग्य समितीचे उपसभापती नगरसेवक नागेश सहारे यांच्यामार्फत होत आहे. अश्या स्पर्धांमुळेच संत्रानगरीतील उदयोन्मुख खेळाडूंना व्यासपीठ मिळाल्याचे प्रतिपादन माजी महापौर व भाजप शहराध्यक्ष प्रविण दटके यांनी केले.

नागपूर महानगरपालिका व आई कुसूम सहारे फाउंडेशनच्यावतीने आयोजित 15व्या आई कुसूम सहारे स्मृती विदर्भास्तरीय फुटबॉल स्पर्धेचा मंगळवारी (ता.२०) समारोप झाला. यावेळी पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी मनपा क्रीडा सभापती प्रमोद चिखले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी, शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने, माजी उपमहापौर संदीप जाधव, जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके, नगरसेविका दिव्या धुरडे, नगरसेविका रिता मुळे, नगरसेवक भगवानजी मेंढे, सामाजिक कार्यकर्ता दशरथ पांडे, बबन पाटील, सायकल पोलो संघटनेचे गजानन बुरडे, अब्दुल रफीक, अॅड. नावेद रिजवी, महिला फुटबॉल प्रशिक्षक अॅनी पॉल, महेश सहारे, तुषार नंदागवळी, प्रशांत पाटील, आशिष फुलझले, आई कुसुम सहारे फाऊंडेशनचे सचिव अॅडविन अॅन्थोनी, आई कुसुम सहारे फाऊंडेशनचे उपाध्यक्ष पीयूष पाटील, धीरज मानवटकर, अब्दुल फारुख, चेतन चिवंडे, चिंटू मेश्राम, हर्षा मदने यांची उपस्थित होते.

पुढे बोलतांना प्रवीण दटके म्हणाले, सलग 20 दिवस फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करणे ही तारेवरची कसरत असते. यामुळे फुटबॉलचे वातावरणच रेशीमबाग मैदानावर आपल्या पाहायला मिळते. नागपूर शहरातील खेळाडूंमध्ये प्रतिभा असून फक्त त्यांना अश्या स्पर्धा राबविण्याची आज गरज आहे. त्यामुळे आजच्या संख्येपेक्षा दुपटीने खेळाडू तयार होतील यात शंका नाही. या पुढेही अशा स्पर्धा वर्षभर नागेश सहारे यांनी राबवून नव्या खेळाडूंना संधी द्यावी असेही ते म्हणाले. यावेळी विजेत्या खेळांडूना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिकांसह चषक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन लकी खान तर आभार नागेश सहारे यांनी मानले.

विजेत्या नवरंग संघाला 1 लाख रोख बक्षीस
अजनी येथील सिम्स नवरंग फुटबॉल क्लबने चुरशीच्या अंतिम लढतीत टायब्रेकरमध्ये बेझनबाग सिनियर फुटबॉल क्लबला 6-5 अशा गोलफरकाने पराभूत करीत आई कुसुम सहारे स्मृती विदर्भस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. विजेत्या नवरंग संघाला 1 लाख रुपये रोख, चषक, मेडल व 14 खेळाडूंना सायकल मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आली. तर उपविजेत्या संघ बेझनबाग सिनियरला 50 हजार रुपये रोख, चषक, मेडल व 16 खेळाडूंना उजाला एलएडी लाईटतर्फे गिफ्ट हँम्पर तसेच तृतीय स्थानातील हर्षिता क्रीडा मंडळ (गुमगाव) 30 हजार रुपये रोख, चषक व मेडल देऊन गौरविण्यात आले. याबरोबर चवथ्या क्रमांकावर असलेल्या कास्मो (मेडीकल) 20 हजार रोख व चषक, पाचवे यंग वॉरियर्स (गड्डीगोदाम) 15 हजार, सहावे टाईम फॅसिलीटी (चंद्रमणीनगर) 10 हजार रोख व चषक, सातवे पटेल प्रिंटर्स (मोमिनपुरा) व आठव्यास्थानी असलेल्या अम्मा (अजनी) क्रीडा मंडळाला 5 हजार रोख व चषक पुरस्कार प्रदान करण्यात आले. पंचाची भूमिका बजाविणारे बंटी रक्षे, अँथ्रेस लाकरा, जॉनी बनार्ड, अविनाश डोंगरे, आयविन डिसुजा, ऑस्कर मिलर, राजू वर्मा, दुर्गेश रिल, करण नायडू, क्रिस्टोफर क्रुझ यांना बबलू खान यांनी ट्रॅकसुट व शूज देऊन सन्मानित करण्यात आले.

जायर अतीर सर्वोत्कृष्ट खेळाडू
संपूर्ण स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू असल्याचा खिताब बेझनबाग सिनियर संघाचा जायर अतीर याने आपल्या नावे केला. त्याला पॅशन प्रो मोटरसायकल प्रदान करून गौरविण्यात आले. तर सिम्स नवरंग संघाचा स्टीवन मचाडो याला स्पर्धेचा बेस्ट डिफेंडर व डिसीप्लीन खेळाडूचा पुरस्कार मिळाला. स्टीवनला एलएडी टिव्ही देऊन मान्यवरांनी त्याचा सत्कार केला. यानंतर बेस्ट गोलकीपर भूषण गायकवाड (बेझनबाग सिनियर), बेस्ट स्कोरर प्रणय भांदेकर (कास्मो) व बेस्ट डिफेंडर मो. नाजीम (बेझनबाग सिनियर) या तिघांना रेंजर सायकल प्रदान करण्यात आले. तसेच मो. शाहरुख (बेझनबाग सिनियर), किशोर कथोटे (हर्षिता), महेश पितलेवार (टाईम फॅसिलीटी) व नईम अन्सारी (यंग वॉरियर्स) या चार खेळाडूंना मोबाईल प्रदान करण्यात आले.