Published On : Tue, Jun 12th, 2018

वीज नियामक आयोग सदस्य इकबाल बोहरी यांची महावितरणला भेट

Advertisement

नागपूर: महाराष्ट्र वीज नियामक आयोगाचे नवनियुक्त सदस्य व कौटुंबिक न्यायालयाचे निवृत्त प्रधान न्यायाधीश इकबाल बोहरी यांनी नुकतेच महावितरणच्या महावितरणच्या नागपूर परिक्षेत्र कार्यालयाला भेट दिली. महावितरणची एकूणच संरचना आणि वीज वितरण क्षेत्रात महावितरणची कामगिरी याबाबत विस्तृत माहिती घेत त्यांनी महावितरणच्या कामाचे कौतूक केले.

इकबाल बोहरी यांच्या प्रथम नगर आगमनाप्रसंगी महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर त्यांनी डिजीटल महावितरण ही चित्रफित बघितली. याप्रसंगी भालचंद्र खंडाईत यांनी संगणकिय सादरीकरणाद्वारे महावितरणबाबत विस्तृत माहिती दिली ज्यात प्रमुख्याने राज्यातील एकूण वीज ग्राहक, त्यांचा वीज वापर, वर्तमान वीजदर, वीज वापरावरील विद्युत शुल्क आणि इतर करांची रचना, व्हीलींग आकार, क्रॉस सबसिडी, महावितरणचा ताळेबंद, आर्थिक परिस्थिती, महावितरणची उपलब्धी, मोबाईल ॲप, डॅशबोर्ड, सौभाग्य योजना, महाराष्ट्रातील एकूण वीज उत्पादन आणि मागणी, इलेक्ट्रॉनिक वाहनांचे चार्जींग स्टेशन्स, नियामक आयोगाशी संबंधित विषयांवर इकबाल बोहरी यांना माहिती दिली.

याप्रसंगी गुणवत्ता नियंत्रण विभागाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर, गोंदीया परिमंडलाचे प्रभारी मुख्य अभियंता सुरेश मडावी, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, उपमहाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) प्रमोद खुळे, प्रभारी उपमहाव्यवस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात यांचेसह अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते उपस्थित होते.