Published On : Tue, Aug 13th, 2019

स्वयंघोषित वीजग्राहक प्रतिनिधीला विद्युत लोकपालाकडून कानउघाडणी

Advertisement

Mahavitaran Logo Marathi

नागपूर: वीज ग्राहकांच्या तक्रारींचे भांडवल करून स्वतःचा व्यावसायिक स्वार्थ बघणा-या व महावितरणला नाहक त्रास देणा-या कथित ग्राहक प्रतिनिधिला सक्त ताकीद देत विद्युत लोकपाल, नागपूर यांनी आपल्या निर्णयात ग्राहक प्रतिनिधींने यापुढे आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ग्राहक प्रतिनिधी म्हणून येतांना संबंधित ग्राहकासमवेत उपस्थित रहावे अन्यथा त्यांची तक्रार सुनावणीस घेतली जाणार नाही, त्यांच्याकडून अशा चूकीची पुनरावृत्ती झाल्यास त्यांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असे सांगत स्वयंघोषित ग्राहक प्रतिनिधीची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

कुंद (शेगाव) तालुका समुद्रपूर, जिल्हा वर्धा येथील प्रकाश धोंडबाजी वाघीडे यांना त्यांच्या शेतात 3 अश्वशक्तीच्या कृषीपंपाला वीजपुरवठा मिळाला नसल्याची तक्रार प्रकाश धोंडबाजी वाघीडे यांच्या वतीन ग्राहक प्रतिनिधी बी.व्ही. बेताल यांनी विद्युत लोकपाल, नागपूर यांचेकडे दाखल केली होती. वीज जोडणी न मिळाल्याने झालेया शेतमालाच्या नुकसान भरपाईपोटी 7 लाख रुपये तसेच झालेल्या शारिरिक व मानसिक त्रासापोटी 15 हजार व 5 हजार प्रवास भाडे प्रवास भाडे आणि संबंधीतावर 25 हजाराचा दंड अशी एकूण 7 लाख 45 हजार रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणीही या तक्रारीत करण्यात आली होती.

याप्रकरणी झालेल्या सुनावणी दरम्यान महावितरणच्या हिंगणघाट विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत प्रल्हाद पावडे यांनी प्रतिवादी म्हणून बाजू मांडतांना भक्कम पुराव्यासह सिद्ध केले की, प्रकाश धोंडबाजी वाघीडे यांनी कधीही कृषीपंपाच्या नवीन वीजजोडणी साठी अर्ज केलेला नसून त्यांचे वडील धोंडबा लक्ष्मण वाघीडे यांनी महावितरणकडे नवीनवीज जोडणीसाठी अर्ज केलेला आहे. याशिवाय, प्रकाश धोंडबाजी वाघीडे यांनी 24 जून 2019 रोजी लोकपाल कार्यालय, नागपूर यांचेकडे तक्रार दाखल करण्यात केली असतांना धोंडबा लक्ष्मण वाघीडे यांना त्यांच्या नवीन वीजजोडणीच्या अर्जानुसार 6 जून 2019 रोजीच उच्चदाब वितरण यंत्रणेत नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. प्रतिवादींनी लोकपाल यांचेपुढे सादर केलेली ही सर्व माहिती योग्य असल्याची कबुली तक्रारदार प्रकाश धोंडबाजी वाघीडे यांनी मान्य करताच ग्राहक प्रतिनिधी बेताल यांना आपला डाव फसल्याचे लक्षात आले व तक्रारकर्त्याने आपल्यापासून सत्य लपवून ठेवल्याचे मान्य करीत लोकपाल यांची बिनशर्त माफी मागितली.

याप्रकरणी आपल्या निकालपत्रात लोकपाल यांनी सदर तकार फ़ेटाळून लावीत ही तक्रार शुल्लक, लबाडी आणि विकृतीचा प्रकार असून ग्राहक प्रतिनिधी बेताल यांची चांगलीच कान उघाडणी केली. बेताल यांनी दाखल केलेल्या अनेक तक्रारी या विषयाशी विसंगत असतात, त्यांच्या या कृतीमुळे कार्यकारी अभियंता, हिंगणघाट यांचा मुल्यवान वेळ निरर्थक वाया गेला. सोबतच अर्जदार प्रकाश वाघीडे यांनाही अनेक अडचणींसोबतच तक्रारीपोटी आर्थिक भुर्दंडही बसला असल्याने बेताल यांनी भविष्यात यापुढे ते ग्राहक प्रतिनिधी असलेल्या प्रकरणात ग्राहकासमवेत उपस्थित रहावे अन्यथा त्यांची तक्रार सुनावणीस घेतली जाणार नाही, त्यांच्याकडून अशा चूकीची पुनरावृत्ती झाल्यास बेताल यांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, अशी स्पष्ट समज विद्युत लोकपाल, नागपूर यांनी विद्युत ग्राहक प्रतिनिधी बी.व्ही. बेताल यांना दिली आहे.

महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक तथा नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल आणि उपविधी अधिकारी डॉ. संदीप केणे यांच्या मार्गदर्शनात हिंगणघाट विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत पावडे यांनी महावितरणची बाजू भक्कमपणे मांडित स्वयंघोषित ग्राहक प्रतिनिधीचा व्यावसायिक स्वार्थ उधलून लावला. यापुर्वीही बेताल यांच्या अश्या विसंगत तक्रारींमुळे महावितरणला नाहक मनःस्ताप झाला असून अनेकदा त्यांच्या तक्रारी फ़ेटाळण्यात आल्या आहेत.