Published On : Thu, Mar 22nd, 2018

डीपीडीसीतून निधी उपलब्ध झाल्यास लगेच वीज जोडणी – ऊर्जामंत्री

Advertisement

नागपुर/मुंबई: अमरावती जिल्ह्यातील वाठोणा खुर्द व कनेक्शन मंदिर (नेरपिंगळाई) येथील पाणीपूरवठा योजनेची वीज जोडणी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध झाल्यास लगेच करण्यात येईल, असे आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिले.

आ.ॲड यशोमती ठाकूर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ऊर्जामंत्र्यांनी उत्तर दिले. ऊर्जामंत्र्यांनी पुढे सांगितले की, पाणीपुरवठा योजनेची वीज जोडणी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आली आहे. प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्धतेसाठी प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठवण्यात आला आहे. पालकमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून दिला तर महावितरण लगेच हे काम करून देईल.

नेरपिंगळाई येथील कनेक्शनवर मंदिरला वीज पुरवठा करण्यासाठी अंदाजपत्रक मंजूर आहे. महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे प्रशासकीय मान्यतेसाठी व निधी उपलब्धतेसाठी पाठवला आहे. निधी प्राप्त होताच कामाला सुरूवात केली जाईल, असे ऊर्जामंत्री यांनी सांगितले. आ. विरेंद्र जगताप यांनीही यावेळी उपप्रश्न विचारलेत.

विजेच्या खांबांची दुरूस्ती
मौजा राईपाडा ते भालतपाडा या भागातील लघुदाब वाहिनीचे खांब पूर्णत: गंजून गेले. ही गावे आदिवासी पाड्यातील असून आदिवासी विभागाने निधी उपलब्ध करून दिल्यास लगेच हे काम करण्यात येईल, असे आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

आदिवासी गावांमधील कामांसाठी स्थानिय जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मिळतो. आदिवासी जिल्ह्यामधील कामे करण्यासाठी 1200 कोटींचा निधी आदिवासी विभागाकडे मागण्यात आला आहे. हा निधी मिळाला की सर्व आदिवासी क्षेत्रातील दुरूस्तीची कामे केली जातील.

चंद्रपूर: अनुशेषाच्या निधीतून प्रलंबित जोडण्या पूर्ण करणार
चंद्रपूर जिल्ह्यातील 2772 कृषीपंप जोडण्या प्रलंबित असून अनुशेषासाठी शासनाने दिलेल्या निधीतून या जोडण्या पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. मात्र थकबाकीदार शेतकऱ्यांनी कृषी वीज पंपाची थकबाकी 5 हजार व 3 हजार भरावी. आतापर्यंत फक्त 10 टक्के शेतकऱ्यांनी थकबाकीपैकी 5 हजार व 3 हजार रूपये भरले आहेत, याकडेही ऊर्जामंत्र्यांनी लक्षवेधले.