नागपूर : अंधश्रद्धेचा आधार घेत ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या भामट्यांचा आणखी एक प्रकार नागपुरात समोर आला आहे. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अज्ञात ठगांनी 81 वर्षीय वृद्ध महिलेला मुलांवर मोठे संकट असल्याची भीती दाखवत विश्वासात घेतले. संकट दूर करण्याच्या बहाण्याने त्यांनी वृद्धेकडील सुमारे 3 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जुलै रोजी संबंधित महिला मंदिरात दर्शन करून घरी परतत असताना वाटेत दोन अनोळखी युवकांनी त्यांना अडवले. त्यापैकी एकाने स्वतःला धार्मिक ज्ञान असलेला व्यक्ती असल्याचे सांगत त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट येणार असल्याचा दावा केला. दुसऱ्या आरोपीनेही त्याच गोष्टीला दुजोरा देत महिलेचा विश्वास संपादन केला.
भामट्यांनी मुलांवरील संकट टाळण्यासाठी सोन्याचे दागिने आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वृद्ध महिलेने अंगावरील सोन्याचे दागिने आणि जवळील रोख रक्कम त्यांच्याकडे दिली.
यानंतर आरोपींनी महिलेला 51 पावले पुढे चालत जा आणि मागे वळून पाहू नका, असे सांगितले. काही अंतर पुढे गेल्यानंतर महिलेला संशय आल्याने त्यांनी मागे पाहिले असता दोन्ही आरोपी दागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार झाल्याचे लक्षात आले.
घटनेची माहिती मिळताच इमामवाडा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित दिसून आले असून, त्यांच्या आधारे शोधमोहीम सुरू आहे.
दरम्यान, नागपुरात अशा प्रकारची ही पहिली घटना नाही. याआधी जरीपटका आणि लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतही वृद्ध महिलांना अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवून दागिने लंपास करण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. त्या प्रकरणांतील आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नसल्याने, या सर्व गुन्ह्यांमागे एकाच टोळीचा हात असण्याची शक्यता तपासली जात आहे.




