जळगाव -राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट वैयक्तिक चारित्र्याला लक्ष्य करत गंभीर आरोप केले आहेत. जळगावमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आरोपांचा सूर इतका तीव्र होता की, चर्चेला अक्षरशः उधाण आले आहे.
“तोंड दाखवण्याची वेळ येईल” –
पत्रकार परिषदेत बोलताना आमदार चव्हाण यांनी दावा केला की, खडसे यांच्याच मतदारसंघातील एका व्यक्तीकडून त्यांनी काही संवेदनशील माहिती मिळवली आहे. “ही माहिती मी जर समोर आणली, तर खडसे यांना लोकांसमोर तोंड दाखवणंही कठीण होईल,” असा थेट इशारा त्यांनी दिला.
अनैतिक संबंधांचा आरोप
चव्हाण यांनी आरोप केला की, “खडसे यांचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध होते. त्या महिला रात्री त्यांच्या निवासस्थानी येत आणि सकाळी त्यांना सोडण्यासाठी खास गाड्या येत असत.” या वक्तव्यानंतर पत्रकार परिषदेत एकच खसखस पसरली.
जे आरोप तुम्ही करता, तेच तुमच्यावरही होत आहेत-
गिरीश महाजन यांच्यावर वारंवार टीका करणाऱ्या खडसेंना चव्हाण यांनी प्रत्युत्तर देताना टोला लगावला. “तुम्ही इतरांवर आरोप करता, पण तुमच्याच लोकांकडून तुमच्यावरही तशाच स्वरूपाचे आरोप ऐकायला मिळतात,” असं सांगत त्यांनी खडसेंना मुक्ताईनगरमध्ये समोरासमोर पत्रकार परिषद घेण्याचं खुले आव्हान दिलं.
वाद आता वैयक्तिक पातळीवर-
खडसे आणि भाजपमधील संघर्ष आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांवर पोहोचल्याचं या घटनाक्रमावरून स्पष्ट होत आहे. हे आरोप केवळ राजकीय नसून खडसे यांच्या वैयक्तिक प्रतिमेवर थेट परिणाम करणारे असल्याने त्याचे परिणाम गंभीर होण्याची शक्यता आहे.या साऱ्या आरोपांवर एकनाथ खडसे यांची अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, त्यांच्या समर्थकांकडून लवकरच ठोस उत्तर देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणामुळे जळगावमधील राजकीय वातावरण आणखी तापणार हे निश्चित आहे.