| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Feb 12th, 2018

  कॅनडासोबतचे संबंध वृध्दिंगत करण्याचे प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  मुंबई :- कॅनडा सोबतचे सौहार्द संबंध वृध्दिंगत होण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले जातील. उद्योग, तंत्रज्ञान आणि आर्थिक क्षेत्रातील परस्पर समन्वय यासाठी महत्त्वपुर्ण ठरेल, असा विश्र्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. कॅनडाच्या आंतरराष्ट्रीय धोरण मंत्री ख्रिस्टीन सेंटपीएरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. या शिष्टमंडळासमवेतच्या बैठकीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

  यावेळी श्रीमती ख्रिस्टीन यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना जूनमध्ये कॅनडामध्ये मोन्टेरिएअल येथे होणाऱ्या अर्थविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेसाठीचे निमंत्रणही दिले. याशिष्टमंडळात क्युबेक वकिलातीचे डोमॅनीक मॅरकोटे, सोनिया झायदै, मॅर्से लॅसोंन्द, ज्ञानेश्वरी तळपदे, पोर्ट ऑफ मोन्टेरिएअलचे उपाध्यक्ष टोनी बोएमी यांचा समावेश होता. याप्रसंगी राज्याचे मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजगोपाल देवरा आदीं उपस्थित होते.

  कॅनडा सोबतच्या सौहार्दपुर्ण संबंधाचा उल्लेख करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हे सौहार्दपुर्ण संबंध वृध्दिंगत होण्यासाठी प्रयत्न केले जातील. महाराष्ट्र विविध क्षेत्रात प्रयोगशील धोरणे राबवित आहे. त्यामध्ये कॅनडाचेही अनेक क्षेत्रात सहकार्य घेता येईल. विशेषतः अर्थ व तंत्रस्नेही धोरणाबाबत महाराष्ट्र अग्रेसर आहे. त्यातूनच आम्ही मुंबई देशाची फिनटेक कॅपिटल व्हावी यासाठी प्रयत्न करत आहोत. ड्रायपोर्ट ही संकल्पनाही देशात पहिल्यांदाच महाराष्ट्र राबवित आहे. त्यातून अशा प्रकारच्या तीन बंदरांचाही विकास दृष्टीपथात आहे. आर्टिफिशीयल इंटेलीजन्स, तसेच क्युबेक-धोरण याबाबत कॅनडाशी महत्त्वपुर्ण असे धोरण आखता येईल. त्यातूनही उद्योग, शिक्षण, तंत्रज्ञान या क्षेत्रात प्रकल्पांना गती देता येईल.

  यावेळी झालेल्या चर्चेत श्रीमती ख्रिस्टीन, तसेच शिष्टमंडळातील सदस्यांनी कॅनडा, मोन्टेरिएल, क्युबेक तसेच बंदर विकास, दळणवळण, शिक्षण अशा अनेकविध क्षेत्रात महाराष्ट्राचे सहकार्य उपयुक्त ठरू शकेल, असा विश्र्वास व्यक्त केला.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145