Published On : Fri, Nov 3rd, 2017

महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून ग्रामीण भागात 363 आजारांवर प्रभावी उपचार व शस्त्रक्रिया – चंद्रशेखर बावनकुळे

Advertisement
  • 13 तालुक्यात दर महिन्यात महाआरोग्य शिबीराचे आयोजन
  • वैद्यकीय महाविद्यालयासह सर्व तज्ञ डॉक्टरांच्या सेवा
  • 2 डिसेंबर रोजी कामठी येथून महाआरोग्य शिबीराची सुरुवात
  • कॅन्सर, ह्दयरोग, किडनी आदी आजारांची तपासणी

Bawankule
नागपूर: ग्रामीण भागातील जनतेला चांगल्या व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देतांनाच कॅन्सर, ह्दयरोग, किडनी आदी 363 दूर्धर आजाराची तपासणी करुन त्यावर तात्काळ उपचार तसेच शस्त्रक्रियाची सुविधा महाआरोग्य अभियानाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. महाआरोग्य शिबीर जिल्हयातील 13 तालुक्यात आयोजित करण्यात येणार असून या शिबीराचा शुभारंभ येत्या 2 व 3 डिसेंबर रोजी कामठी येथून होणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली.

जिल्हा परिषदेच्या डॉ. आबासाहेब खेडकर सभागृहात महाआरोग्य शिबीर आयोजन तसेच ग्रामीण भागातील पिण्याचे पाण्याचा आराखडा संदर्भात आढावा घेण्यात आला त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. यावेळी आमदार सुधीर पारवे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर, उपाध्यक्ष शरद डोणेकर, सभापती दीपक गेडाम, श्रीमती आशा गायकवाड, श्रीमती पुष्पा वाघाडे, उकेश चव्हाण, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीमती कांदबरी बलकवडे, अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी अंकुश केदार, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजीव जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निंबाळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी रुपेश सवई आदी उपस्थित होते.

महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी करुन या तपासणीमध्ये आढळलेल्य विविध आजाराच्या रुग्णांवर तेथेच उपचार करण्यात येतील. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तसेच इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याची सूचना करतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जिल्हा आरोग्य समन्वय समितीमार्फत या शिबीराचे आयोजन करण्यात यावे. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन संदर्भात बैठक घेवून संपूर्ण आराखडा तयार करण्यात यावा. या शिबीरामध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह भोजनाची सुविधा सुध्दा उपलब्ध करुन देण्यात यावी. या शिबीरासोबतच आरोग्य संबंधिच्या सर्व योजनांची माहिती यावेळी देण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

महाआरोग्य शिबीर प्रत्येक तालुक्यात महिन्याच्या पहिल्या शनिवार आणि रविवार या दोन दिवशी आयोजित करण्यात यावे. यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या वैशिष्टयपूर्ण उपक्रमातून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच रुग्णांना आवश्यक असलेली विविध औषधांचा पुरवठा औषध निर्माण करणाऱ्या कंपनी तसेच पुरवठादारांकडून उपलब्ध करण्यासोबत या उपक्रमाच्या आयोजनासाठी अशासकीय संस्था व उद्योजकांचे सहकार्य घेण्यासंदर्भातही याबैठकीत चर्चा करण्यात आली.

महाआरोग्य शिबिरात रक्तदाब, कर्करोग, नेत्र तपासणी, रक्त तपासणी यासारख्या विविध आजारांच्या रुग्णांची तपासणी व औषधोपचार तसेच अवयवदानाचे अर्ज भरण्याची सुविधा महाआरोग्य शिबिरात करण्यात येणार आहे. रुग्णांची तपासणी करण्याकरिता तज्ज्ञ डॉक्टरांची चमू शिबिरात मार्गदर्शन करणार आहे. तसेच शिबिरात येणाऱ्या रुग्णांना सर्व सोयींचा लाभ देण्यात येईल. असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

पाणी टंचाई काळात आवश्यक उपाययोजना
जिल्हयातील पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणासाठी जिल्हास्तरीय आराखडा तयार करण्यात आला असून या आराखडयानुसार तीन भागात विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या आराखडयानुसार सूचविण्यात आलेल्या उपाययोजनानुसार पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, अपूर्ण नळयोजना पूर्ण करणे यासंदर्भात महसूल उपविभागीय अधिकारी यांनी तालुकास्तरावर आढावा घेण्यात यावा व त्यानुसार कार्यवाही पूर्ण करावी, अशी सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असलेल्या गावांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील कामांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा, तसेच संपूर्ण नळयोजना सुरु राहतील याकडे विशेष लक्ष द्यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा परिषदेतर्फे ग्रामीणभागात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेताना जिल्हयातील सर्व शाळा डिजिटल करणे, तसेच सोलरवर आणण्यासंदर्भात तात्काळ प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना केली.


मुलभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य

ग्रामीण भागाच्या विकासासाठी चौदाव्या वित्त आयोगाअंतर्गत, तसेच दलित वस्ती विकासासाठी प्राप्त झालेल्या निधीमधून आरोगय, पिण्याचे पाणी, विद्युत विकास, तसेच स्वच्छता या बाबींची पुरतता करण्यासाठी प्रस्ताव तयार करावे यामध्ये सिमेंटच्या रस्त्यांची कामे घेवू नये अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यात.

मुलभूत सुविधांची कामे पूर्ण झाल्यानंतर या सर्व कामांची छायाचित्रे घेवून त्याचा अहवाल गटविकास अधिकारी यांनी तयार करावा. तसेच मुलभूत सुविधा पूर्ण झाल्यानंतरच प्रमाणपत्र दिल्यानंतर आवश्यकता असेल तेथेच सिमेंटची रस्ते घ्यावी अशी सूचना यावेळी त्यांनी केली.

तालुक्यात डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तालुकास्तरावर विशेष जनजागृती अभियान राबविण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांना यावेळी केल्या. नागपूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये फॉगींग मशीनची व्यवस्था करुन गावागावात फवारणी करा, गप्पी मासे अभियान राबवा, शाळा, महाविद्यालयात जावून विद्यार्थ्यांमध्ये या आजारांविषयी जनजागृती करा. डेंग्यू आणि मलेरिया या आजारांवर नियंत्रणाकरिता आरोग्य उपकेंद्रात लसीकरण आणि जनजागृती करणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. तसेच गावात आरोग्य जनजागृती मोहिम राबवितांना गटविकास अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांना मुख्यालयी राहण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

प्रारंभी मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी स्वागत करुन जिल्हयातील विविध विकास कामासंदर्भात माहिती दिली. बैठकीला विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.