Published On : Fri, Nov 3rd, 2017

विदर्भातील कलावंतांचा ‘इगो’ ठरतोय डोकेदुखी

Advertisement
entertainment

Representational pic

नागपूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची विदर्भ विभागीय शाखा स्थापन होणार हे निश्‍चित झाल्यावर कार्यकारिणीत स्थान मिळविण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. या चढाओढीमुळेच कार्यकारिणीवर अद्याप शिक्कामोर्तब होऊ शकलेले नाही. महामंडळाच्या मुख्य शाखेतील पदाधिकाऱ्यांसाठी मात्र विदर्भातील कलावंतांचा आपसांतील ‘इगो’ आता डोकेदुखी ठरू लागला आहे.

गेल्या पंधरा वर्षांमध्ये चित्रपट निर्मितीत विदर्भाचे मोठे योगदान राहिलेले आहे. नवे-जुने कलावंत, तंत्रज्ञ, सोयी-सुविधा, चित्रीकरणासाठी योग्य अशा स्थळांनी एकूणच मराठी आणि हिंदी चित्रपट निर्मात्यांना भुरळ घातली आहे. याच कारणाने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची विदर्भ विभागीय शाखा नागपुरात स्थापन व्हावी, ही मागणीही अधिक जोर धरू लागली. काही वर्षांपूर्वी विजय पाटकर आणि आता मेघराजराजे भोसले या नेतृत्वांनी या मागणीवर सकारात्मक विचार केला. यंदा त्यावर अंमलबजावणीचा मुहूर्तही साधला. नागपुरात महामंडळाच्या कार्यालयासाठी जागा निश्‍चित झाली, संभावित कार्यकारिणीचा विचार करण्यात आला आणि नवरात्रादरम्यान शाखेचे उद्‌घाटन करावे, असेही जवळपास ठरविण्यात आले. मात्र, मध्येच माशी शिंकली.

महामंडळाच्या कार्यकारिणीत स्थान मिळविण्यासाठी आपणच कसे योग्य आहोत, हे सांगणारे अनेक कलावंत पुढे आले. महामंडळाची शाखा विदर्भात सुरू व्हावी, यासाठी आपणच सर्वाधिक प्रयत्न केले, असा दावा अनेक लोक करू लागले. अर्थात विदर्भातील कलावंतांचे प्रयत्न आणि माध्यमांनी लावलेला जोर याशिवाय हे होणे शक्‍यही नव्हते. मात्र, ‘मी प्रयत्न केले नसते तर हे झालेच नसते’ असा प्रचार अनेक कलावंत करू लागले. महामंडळाच्या अध्यक्षांपर्यंत ही चढाओढ पोहोचणे स्वाभाविक होते. प्रत्येकाचा ‘ईगो’ आडवा येत असल्याचे त्यांच्याही लक्षात आले असावे. कदाचित म्हणूनच त्यांनी कार्यकारिणीचा नाद सोडून उद्‌घाटन सोहळ्यावर लक्ष केंद्रित केले. सध्या महामंडळ अध्यक्षांच्या अजेंड्यावर कार्यकारिणीचा विषय नसल्यामुळे विशिष्ट कलावंतांची छुपी मोर्चेबांधणीदेखील थांबलेली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीचा अशा पद्धतीने बळी गेला, तर त्यात वैदर्भी चित्रपटसृष्टीचेच नुकसान होईल, अशी भावना आता उमटू लागली आहे. स्थानिक राजकारणाचा हा केवळ ट्रेलर आहे, ‘पिक्‍चर’ अभी बाकी है !

Advertisement