मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कंपन्यांवर सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठ्या प्रमाणात छापेमारी सुरू केली आहे. आर्थिक अनियमिततेच्या संशयावरून ईडीने गुरुवारी देशभरात ५० पेक्षा अधिक ठिकाणी एकाचवेळी कारवाई केली. यात अनिल अंबानी यांची प्रमुख कंपनी रिलायन्स होम फायनान्स आणि त्यांच्याशी संबंधित इतर व्यावसायिक गटांचा समावेश आहे. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही तपासाची संधी आली आहे.
मनी लॉन्ड्रिंगच्या संशयावरून कारवाई, विविध संस्थांचे अहवाल ठरले आधार-
या कारवाईसाठी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) लागू करण्यात आला आहे. या तपासाची मूळ सूत्रं नॅशनल हाऊसिंग बँक, SEBI, नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी, बँक ऑफ बडोदा आणि सीबीआयने दाखल केलेल्या दोन एफआयआरमध्ये दडलेली आहेत. विशेषतः रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड मधील काही संशयित व्यवहारांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरांवरही धाड-
छापेमारी केवळ कार्यालयापुरती मर्यादित नसून, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानीही ईडीने छापे टाकले आहेत. अनेक ठिकाणी आर्थिक कागदपत्रं, व्यवहार नोंदी, करारपत्रं आणि बँक खात्यांची झाडाझडती सुरू आहे. काही अधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात आले असून, लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई ते दिल्लीसह देशभरात एकाचवेळी मोठी कारवाई-
ही कारवाई एकाचवेळी मुंबई, ठाणे, पुणे, दिल्ली, अहमदाबाद यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये करण्यात आली. यामध्ये व्यावसायिक कार्यालये, डिजिटल रेकॉर्ड्स, बँक खाती आणि महत्त्वाच्या रिअल इस्टेट मालमत्तांचा समावेश आहे. ईडीच्या मते, ही मोहिम आतापर्यंतची सर्वांत व्यापक कारवायांपैकी एक मानली जात आहे.
आधीपासून आर्थिक अडचणीत असलेल्या कंपन्यांवर आणखी दबाव-
यापूर्वीच अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि रिलायन्स कॅपिटल या कंपन्या आर्थिक संकटात सापडल्या होत्या. थकीत कर्जं, बाजारातील विश्वासहरण आणि नियामकांची कारवाई या पार्श्वभूमीवर ही छापेमारी त्यांच्यासाठी आणखी डोकेदुखी ठरू शकते.