नागपूर : नागपुरात सीबीआय (CBI) आणि ईडी (ED)च्या अधिकाऱ्यांकडून छापेमारी सुरू कऱण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याशी संबंधित सीए विशाल खटवानी (CA Vishal Khatwani) यांच्या घरी हे सर्च ऑपरेशन करण्यात आलं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तब्बल तीन तास हे सर्च ऑपरेशन करण्यात आलं असल्याचं वृत्त समोर आलं आहे.
नागपुरात सीबीआयने सर्च ऑपरेशन सुरू केलं. नागपुरातील कोराडी लॅवरेज ग्रीन परिसरात सीबीआयकडून छापेमारी सुरू करण्यात आली. सीए आणि शेअर ट्रेडिंग व्यवहारांशी संबंधित व्यक्तीवर सीबीआयने छापेमारी केली आहे.
ज्या व्यक्तीच्या कार्यालयावर छापेमारी करण्यात आली आहे ती एक सीए असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचं नाव विशाल खटवानी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. लॅवरेज ग्रीन सोसायटीत ही छापेमारी करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांच्याशी संबंधित ही छापेमारी करण्यात आली असल्याचं बोललं जात आहे. मात्र, अद्याप या संदर्भात कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाहीये.
या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांनाही या इमारतीत प्रवेश अद्याप देण्यात आलेला नाहीये. या छापेमारी संदर्भात अत्यंत गुप्तपणे कारवाई करण्यात येत असल्याचं समोर आलं आहे.
सीताराम कुंटेंचा ईडीसमोर गौप्यस्फोट
काही दिवसांपूर्वी असं वृत्त समोर आलं होतं की, सीताराम कुंटे यांनी ईडीसमोर एक गौप्यस्फोट केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या संदर्भात ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनेक अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. त्यात राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर एक मोठा आणि धक्कादायक गौप्यस्फोट केला असल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीताराम कुंटे यांनी ईडीसमोर दिलेल्या जबाबानुसार, सीताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटलं की अनिल देशमुख गृहमंत्री असताना मला पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे. मी त्यांच्या अधीन काम करत होतो आणि त्यामुळे त्या याद्या स्वीकारायला मी नकार देऊ शकत नव्हतो.
सचिन वाझेच्या पुनर्नियुक्तीचा अनिल देशमुखांवर दबाव
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ईडीला दिलेल्या निवेदनात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ईडीने परमबीर सिंग यांना निलंबित एपीआय सचिन वाझे याला पुन्हा सेवेत रुजू करण्याबाबत आपली भूमिका काय होती? असा प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाचं उत्तर देताना सिंग यांनी धक्कादायक दावा केला आहे. सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर दबाव होता. आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तशा सूचना होत्या, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे.