Published On : Fri, Sep 18th, 2020

विषाणूचा सामना करण्यासाठी सात्विक आहार घ्या

प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ.जयश्री पेंढारकर यांचे ‘कोव्हिड संवाद’ मध्ये आवाहन

नागपूर : आज प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे हे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी योग, प्राणायाम आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविणारा आहार घेणे हे प्रत्येकासाठीच गरजेचे आहे. कोरोनाच्या विषाणूचा सामना करताना उत्तम रोगप्रतिकारशक्ती हाच मंत्र आहे. ही रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कुठलीही औषधे विकत घेण्याची गरज नाही. आपण दररोज घेतो तो आहार अधिक सात्विक असणे आवश्यक आहे. विषाणूचा सामना करताना सात्विक आहार प्रत्येकानेच घ्यावा, असे आवाहन प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ.जयश्री पेंढारकर यांनी केले.

नागपूर महानगरपालिकेचे महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात शुक्रवारी (ता.१८) त्या बोलत होत्या.

शरीराची योग्य वाढ व्हावी, उर्जा मिळावी, शरीराची झिज भरून निघावी, रोगप्रतिकारशक्ती वाढावी यासाठी आपल्याला आहाराची गरज आहे. हा आहार संतुलित, सकस आणि सात्विक असणे आवश्यक आहे. यासाठी मांसाहार करण्याचीही गरज नाही. शाकाहारातूनच आपल्याला आवश्यक ती सर्व पोषक तत्वे मिळतात. आपल्या शरीराला ५० टक्के प्रथिनांची गरज असते. रक्त पेशी, पांढ-या पेशींसाठी शरीरात भरपूर प्रथिनांची गरज असते. कोरोना विषाणूचा सामना करताना व्हिटॅमिन सी आणि डी महत्वाचे आहे. ते लिंबूवर्गीय फळे जसे लिंबू, मोसंबी, आवळा या फळांचा रोजच्या आहारात भरपूर समावेश करा, असेही डॉ. जयश्री पेंढारकर यांनी सांगितले.

आपल्या शरीराला साखरेची गरज नाही त्यामुळे ती शक्यतो टाळाच. शरीरात ग्लूकोज तयार होत असल्याने वेगळी साखर घेणे हे धोकादायकच आहे. याशिवाय तळलेले पदार्थ कटाक्षाने टाळा. तळलेल्या पदार्थात ‘ट्रान्स फॅटी ॲसिड’ तयार होतो जे रोगाचे मुख्य कारण आहे. रिफाइन्ड तेल खाणे हे सुद्धा धोक्याचे आहे. तेलबियांपासून तयार होणारे घाणीचे तेलाचाच आहारात समावेश करा.

गायीचे तूप, डाळ, शेंगदाणे, फुटाणे हे सर्व रोजच्या आहारात घेणे गरजेचे आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कॅल्शियम हा सुद्धा अत्यंत महत्वाचा घटक आहे. दुध, दही, ताक यामधून कॅल्शियम मिळते, त्यामुळे त्याचे भरपूर सेवन करा. लोहतत्वासाठी हिरव्या भाज्या, स्टिल आणि लोखंडांच्या भांड्यांचा उपयोग करा. बाहेरचे जंक फूड खाणे बंदच करा, असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला. नैसर्गिक स्वरूपातील घरचे अन्नपदार्थ खाणे हाच आजच्या स्थितीत उत्तम जीवनशैलीचा मंत्र आहे, असेही डॉ.जयश्री पेंढारकर म्हणाल्या.