Published On : Mon, Jul 13th, 2020

कृषी मालावर आधारित उद्योग, अर्थव्यवस्था, निर्यातवाढ, नवीन तंत्रज्ञान हा आत्मनिर्भरतेचा मार्ग : नितीन गडकरी

‘आत्मनिर्भर भारत’ या विषयावर ई संवाद

नागपूर देशातील कृषी मालावर आधारित उद्योग, अर्थव्यवस्था, कमी खर्चात आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्पादन, निर्यातीत वाढ आणि आयातीसाठी नवा पर्याय शोधणे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर हा आत्मनिर्भरतेकडे जाणारा मार्ग असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

‘आत्मनिर्भर भारत’ या विषयावर आज ते व्हिडिओ कान्फरन्सच्या माध्यमातून बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेली 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था आणि 100 लाख कोटींच्या पायाभूत सुविधा हे कठीण असले तर असंभव नाही असे सांगत ना. गडकरी म्हणाले- कृषी मालावर आधारित उद्योगांसाठी आम्ही अ‍ॅग्रो एमएसएमईची संकल्पना आणली असून त्या माध्यमातून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज शहराकडे सर्वांची ओढ आहे. त्यामुळे शहरांमध्ये नागरी सुविधांपासून प्रदूषणापर्यंत विविध समस्या निर्माण झाल्या आहेत.

त्या समस्या सोडविण्यासाठी कृषी आणि ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था मजबूत करणे आवश्यक आहे. या व्यवस्थेअंतर्गत स्मार्ट सिटी, स्मार्ट व्हिलेजचे निर्माण आपण करू शकतो. त्यामुळे कृषी ग्रामीण भागात पायाभूत सुविधा उपलब्ध होऊन शहराकडे जाणारे लोंढे थांबतील, असेही ते म्हणाले.

कृषी क्षेत्राला ऊर्जा क्षेत्राकडे वळविण्याच्या प्रयत्नात ग्रामीण भागात जैविक इंधन अर्थव्यवस्था नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित केली तर इंधनाची आयात कमी होईल, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- कृषी-जंगल क्षेत्रात असलेल्या अखाद्य तेलबियांद्वारा जैविक इंधन निर्माण करता येते. याबाबतचे प्रयोग यशस्वी झाले आहे. त्यामुळे रोजगार निर्माण होईल व सध्याच्या इंधनाच्या आयातीला पर्याय निर्माण होईल.

सुधारणा, परिवर्तन आणि कृती हा शासनाचा उद्देश-मार्ग आहे. यातूनच आत्मनिर्भरतेकडे देश जाईल. तंत्रज्ञानाचा विकास केल्याशिवाय आपल्याला काही विकास शक्य होणार नाही, असेही ते म्हणाले.

आत्मनिर्भरतेकडे जाण्यासाठी उद्योग आणि सेवा क्षेत्रात परकीय गुंतवणूक, सार्वजनिक खाजगी गुंतवणूक आणणे आवश्यक आहे. उद्योग क्षेत्रात कमी खर्चात उत्पादन वाढविणे, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, वाहतूक खर्च, ऊर्जा खर्च कमी करणे, कौशल्य असलेले मनुष्यबळ वापरणे, नवीन संशोधन, कायद्यात सुधारणा, पारदर्शकता यामुळे उद्योगांचे उत्पादन आंतरराष्ट्रीय दर्जाचे होईल व ते निर्यातक्षम राहील.

सध्या कोविड 19 चा काळ असल्यामुळे जगभरातील गुंतवणूकदार चीनशी व्यवहार करू इच्छित नसल्यामुळे भारत हा गुंतवणुकीस पर्याय निर्माण झाला आहे. आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी या मार्गाने जाणे आवश्यक आहे. राजकारण हे सामाजिक आणि आर्थिक सुधारणांचे एक साधन आहे, या भावनेतून काम करणे.

तसेच सामाजिक समानता प्रस्थापित करण्यासाठी समाजातील शेवटच्या व्यक्तीला, गरीब व्यक्तीला केंद्रबिंदू मानून अर्थव्यवस्थेची नीती ठरवणे, हे करीत असताना उच्च व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करणे, हाच आत्मनिर्भरतेकडे जाणारा मार्ग असल्याचेही ना. गडकरी म्हणाले.