Published On : Sat, Aug 17th, 2019

ई-वाचनालय ही चळवळ व्हावी : महापौर नंदा जिचकार

बाजीराव साखरे वाचनालयाचे लोकार्पण :

नागपूर : नागपुरात समृद्ध ग्रंथालये आहेत. काळानुरूप त्याचे स्वरूप बदलते आहे. तंत्रज्ञानाच्या युगात ग्रंथालयांना ई-रूप देणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून नागपूर महानगरपालिका अनेक ग्रंथालयांचे रूपांतर ई-ग्रंथालयात करीत आहे. ई-ग्रंथालय ही चळवळ व्हावी. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयांचा उपयोग करून ज्ञानार्जनाचे कार्य करावे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या दलित वस्! सुधारणा योजनेअंतर्गत प्राप्त निधीमधून निर्माण करण्यात आलेले लष्करीबाग येथील बाजीराव साखरे वाचनालयाचे (ई-ग्रंथालय) लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी आयोजित सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. ग्रंथालयाचे उद्‌घाटन व लोकार्पण उत्तर नागपूरचे आमदार डॉ. मिलिंद माने यांच्या हस्ते झाले. यावेळी मंचावर महापौर नंदा जिचकार, आमदार डॉ. मिलिंद माने यांच्यासह आरोग्य समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, कर आकारणी समितीचे उपसभापती सुनील अग्रवाल, बसपाच्या गटनेत्या वैशाली नारनवरे, आशीनगर झोन सभापती विरंका भिवगडे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, नगरसेवक संदीप सहारे, नगरसेवक महेंद्र धनविजय, मंगला लांजेवार, भावना लोणारे, नगरसेवक संजय चावरे, माजी नगरसेवक प्रभाकर येवले, महेंद्र भांगे, दीपक गौर, आसीनगर झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, ग्रंथालय अधीक्षक अल्का गावंडे, संज़य तरारे उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, बाजीराव साखरे वाचनालय हे पूर्वी एक लहान वाचनालय होते. येथे अत्याधुनिक, मोठे वाचनालय व्हावे यासाठी माजी मंत्री नितीन राऊत यांनी पुढाकार घेतला. निधी उपलब्ध करून दिला. नगरसेवक संदीप सहारे यांनी सातत्याने त्याचा पाठपुरावा केला. मागील चार वर्षांपासून काही अडचणींमुळे लोकार्पण रखडले होते. यातील सर्व प्रशासकीय अडचणी दूर करून विद्यार्थ्यांसाठी हे खुले करताना अतीव आनंद होत आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या करिअरसाठी वाचनालयाचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

उद्‌घाटनपर भाषणात बोलताना आमदार डॉ. मिलिंद माने म्हणाले, बाजीराव साखरे हे स्वातंत्र्य संग्राम सैनिक होते. सतत तीन वेळा नगरसेवक होते. स्थायी समितीचे सभापतीपद त्यांनी भूषविले. ते पहेलवान होते. गुणवंत कामगार होते. दलितमित्र पुरस्काराने शासनाने त्यांचा गौरव केला. ज्यांनी समाजकार्यासाठी आपला देह झिजविला अशा व्यक्तीच्या नावे उत्तर नागपुरात ई-ग्रंथालयाचे लोकार्पण होते, ही गर्वाची बाब आहे. केवळ उत्तर नागपुरातीलच नव्हे तर संपूर्ण नागपुरात असे ग्रंथालय नाही. माजी मंत्री नितीन राऊत यांनी ग्रंथालयाचा पाया रचला. योगायोगाने त्या ग्रंथालयाचे लोकार्पण करण्याची संधी आम्हाला मिळाली. आता नागरिकांनी या वाचनालयाची देखरेख करावी, असे ते म्हणाले. ग्रंथालयातील संगणकासाठी आमदार निधीतून ५० लाख रुपये देण्याची घोषणा आमदार डॉ. मिलिंद माने यांनी यावेळी केली.

प्रास्ताविकातून नगरसेवक संदीप सहारे यांनी बाजीराव साखरे ग्रंथालय अत्याधुनिक करण्याचा प्रवास सांगितला. मागील चार वर्षापासून उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्रंथालयाला ग्रंथसंपदेसाठी, संगणकांसाठी निधी मिळावा यासाठी बराच पाठपुरावा केला. मनपाच्या स्थायी समितीने ५० लाखांचा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांचेही त्यांनी आभार मानले. ग्रंथालय इमारतीची माहिती त्यांनी यावेळी दिली. या ग्रंथालयात अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी वातानुकुलित हॉल असून त्यासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तत्पूर्वी महापौर नंदा जिचकार, आमदार डॉ. मिलिंद माने आणि मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्‌घाटन केले. त्यानंतर फीत कापून आणि कोनशीलेचे अनावरण करून बाजीराव साखरे वाचनालयाचे लोकार्पण केले. यावेळी भोला शेंडे व परिसरातील नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र बाजीराव साखरे वाचनालयाकरिता भेट दिले. कार्यक्रमाचे संचालन मनपाचे सेवानिवृत्त जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले. आभार ग्रंथालय अधीक्षक अल्का गावंडे यांनी मानले. मान्यवरांचे स्वागत विशाल शेवारे, त्रिशरण सहारे, मंजुश्री कन्हेरे, रघुनाथ केटगुडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अमोल गेडाम, चंदू टेकडे, पियूष मेश्राम, कैलास वनदुधे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.