Published On : Sat, Mar 24th, 2018

भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्य आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर : खा. अशोक चव्हाण

Advertisement


अमरावती: सरकारचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले असून खोट्या जाहिरातींवर शेकडो कोटींची उधळपट्टी सुरु आहे. राज्यावरील कर्जाचा डोंगर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. सरकार राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा दररोज वाढवत चालले आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांनी राज्याला आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

अमरावती येथे काँग्रेस पक्षाच्या व्हिजन २०१९ या जिल्हास्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराला मार्गदर्शन करताना खा. चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, मोदी आणि फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. महागाई कमी झाली नाही उलट इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. सरकारने लावलेल्या कर आणि अधिभारांमुळे महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेलचे दर देशात सर्वाधिक आहेत. गेल्या साडे तीन वर्षात मोदी आणि फडणवीस यांनी भाषणे आणि घोषणा करण्याशिवाय काहीही केले नाही. बोंडअळीग्रस्त, गारपीटग्रस्त शेतक-यांना अद्याप मदत मिळाली नाही. राज्यातील बहुतांशी शेतक-यांना कर्जमाफी मिळाली नाही. मागासवर्गीय, आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. कुषोषणामुळे होणा-या मृत्यूची संख्या वाढत चालली आहे. सरकारने केलेल्या फसवणुकीमुळे जनतेत तीव्र संताप असून शेतकरी, विद्यार्थी, महिला, कामगार, अंगणवाडी सेविका, एसटी कर्मचारी असे समाजातील सर्वच घटक सरकारविरोधात रस्त्यावर आंदोलने करित आहेत. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही जनतेच्या आवाज बनून रस्त्यावर उतरून सरकारविरोधातील संघर्ष तीव्र करावा असे आवाहन त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले.


राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही सरकारवरच्या चुकीच्या धोरणांचा पंचनामा केला. ते म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात देशात आघाडीवर असणा-या महाराष्ट्राची भाजपच्या काळात अधोगती झाली आहे. विधानपरिषेदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, राजेंद्र मुळूक, माजी खा. भालचंद्र मुणगेकर, आ. विरेंद्र जगताप, आ. यशोमती ठाकूर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिरूध्द उर्फ बब्लू देशमुख यांनीही या शिबिराला मार्गदर्शन केले. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभिजीत सपकाळ यांनी सोशल मिडीया संदर्भात सादरीकरण केले.

Gold Rate
28 April 2025
Gold 24 KT 95,700 /-
Gold 22 KT 89,000 /-
Silver / Kg 97,200 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above


यावेळी माजी आमदार रावसाहेब शेखावत, माजी आमदार केवलराम काळे प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शाम उमाळकर, पृथ्वीराज साठे, सचिव शाहआलम शेख, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर बोरकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


तत्पूर्वी खा. अशोक चव्हाण यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांशी चर्चा करून आढावा घेतला. तसेच माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली यावेळी त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर बोरकर उपस्थित होते.

Advertisement
Advertisement