Published On : Sat, Oct 27th, 2018

दुष्काळसदृष्य स्थितीमुळे 50 टक्केपेक्षा अधिक पिकांचे नुकसान

नागपूर: काटोल, नरखेड आणि कळमेश्वर या तीन तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील कापूस, तूर आणि सोयाबीन ÷उत्पादक शेतकर्‍यांचे 50 टक्केपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले असून या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटात सापडला असताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिवसभर या तीनही तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या पिकांची प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली व त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. शासन शेतकर्‍याच्या पाठीशी असून शेतकर्‍याला वार्‍यावर सोडले जाणार नाही, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी याप्रसंगी त्यांना दिले.

पाऊस लवकर निघून गेल्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून पीक ऐन हातात येण्याच्या तयारीत असताना नैसर्गिक संकटाचा फटका या शेतकर्‍यांना बसला आहे. कापसाची बोंडे फुटली आहे. झाडाला फुले आणि पात्या आहेत, अशा स्थितीत पाणी मिळाले तर शेतकर्‍याचे उत्पन्न आजच्यापेक्षा दुप्पट झाले असते. पालकमंत्री बावनकुळे यांनी आज कळमेश्वर तालुक्यातील बोरगाव खुर्द, तोंडाखैरी, पारडी देशमुख, काटोल तालुक्यात सोनखांब, ताराबोडी, चिखली मैना, नरखेड तालुक्यात शेमडा, अंबाडा देशमुख, मसोरा या गावातील शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली.

याप्रसंगी पालकमंत्र्यांसोबत जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, आ. गिरीश व्यास, भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, भाजपाचे नेते रमेश मानकर, भाजप नेते अशोक धोटे, महामंत्री अरविंद गजभिये, काटोलचे नगराध्यक्ष चरणसिंग ठाकूर, महामंत्री संजय टेकाडे, किशोर रेवतकर, जि.प. शिक्षण सभापती उकेश चव्हाण, काटोल पं.स.चे सभापती संदीप सरोदे, उपविभागीय अधिकारी, कृषी अधीक्षक, सर्व विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
तुरीचे पीक फुलावर आहे. सोयाबीनचे पीक 50 टक्के गेले आणि पाण्याअभावी कापसाच्या पिकाचे उत्पन्नही होत आहे. याशिवाय कापसावर लाल्या रोगाचा प्रभावही अनेक ठिकाणी जाणवला. जिल्ह्यातील तीन तालुक्यात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.

राज्यातील 180 दुष्काळी तालुक्यांमध्ये या तीन तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. कृषी विभागाला पालकमंत्र्यांनी त्वरित सर्वेक्षणाचे निर्देश दिले असून नुकसान झालेला एकही शेतकरी सर्वेक्षणातून सुटता कामा नये अशी सूचनाही केली. दुष्काळी भागातील शेतकर्‍याची परिस्थिती गंभीर असून 50 टक्केपेक्षा अधिक नुकसान आहे. नैसर्गिक आपत्ती आली तरी खचून जाऊ नका, शासन शेतकर्‍याच्या पाठीशी आहे. शासन शेतकर्‍याला नुकसानभरपाई देईल, असा दिलासाही त्यांनी दिला. तसेच नाफेडने मागील वर्षी खरेदी केलेल्या शेतकर्‍यांच्या तुरीचे पैसेही लवकर मिळवून देण्यात येतील असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

काटोल तालुक्यात एकूण 49915 हेक्टरवर पेरणी करण्यात आली असून त्यापैकी 24520 हेक्टर कापूस, 14616 हेक्टर सोयाबीन व 6639 हेक्टरवर तुरीची पेरणी करण्यात आली आहे. नरखेड तालुक्यात 49904 हेक्टर एकूण पेरणीक्षेत्र असून त्यापैकी कापूस 24821 हेक्टर, सोयाबीन 13949 हेक्टर, तूर 7078 हेक्टर. कळमेश्वर तालुक्यात 35426 हेक्टर क्षेत्र पेरणीखाली असून त्यापैकी तूर 5750 हेक्टर, सोयाबीन 2780 हेक्टर तर कापूस 21028 हेक्टरवर पेरण्यात आला आहे.

या दरम्यान शेतकर्‍यांनी दिवसा विजेची मागणी केली. पण अचानक वाढलेल्या विजेच्या मागणीमुळे या भागातील शेतकर्‍यांसाठी दिवसा वीजपुरवठ्याचे नवीन नियोजन करण्याचे निर्देशही महावितरणच्या अधिकार्‍याना दिले. काही गावांमध्ये शेतकर्‍यांच्या कृषीपंपाचे फीडर ट्रिप होत असल्याची तक्रारही पालकमंत्र्यांकडे करण्यात आली. पाऊस कमी झाल्यामुळे अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. अशा गावांमध्ये विंधन विहीर तयार करून तेथे फिल्टर प्लांट लावण्यात येतील. या तीन तालुक्यांकडे पालकमंत्र्यांचे सतत लक्ष राहणार आहे.

दुष्काळाचे राजकारण नको
शेतकर्‍यांवर कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीचे व दुष्काळाचे राजकीय पक्षांनी राजकारण करू नये, सर्वांनी शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मदत करावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज काटोल येथे केले. जिल्ह्यातील तीन तालुक्यात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. या संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना दिलासा, मदत देऊन धीर देण्याची गरज असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.