Published On : Sat, Oct 27th, 2018

अप्पर पैनगंगेचे पाणी इतरत्र वळवल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करूः खा. अशोक चव्हाण

Advertisement

नांदेड:भाजप शिवसेना सरकारने मराठवाड्च्या हक्काचे अप्पर पैनगंगाचे ६५ टीएमसी पाणी इतरत्र वळविण्याचा घाट घातला आहे. राज्य सरकारचा हा निर्णय अत्यंत अन्यायकारक असून यामुळे नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्याला पाणी मिळणार नाही. सरकारच्या या निर्णयाविरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करेल असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे खा. अशोक चव्हाण यांनी दिला आहे.

काँग्रेस पक्षाची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा आज नांदेडवरून तामसा मार्गे हदगाव येथे पोहोचली. रस्त्यात गावोगावी नागरिकांनी जनसंघर्ष यात्रेचे जंगी स्वागत केले. त्यानंतर हदगाव येथे विशाल जनसंघर्ष सभेला मार्गदर्शन करताना खा. चव्हाण बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. बाळासाहेब थोरात, आ. डी. पी. सावंत, आ. अमर राजूरकर जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, हनुमंत पाटील बेटमोगरेकर, माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, नगराध्यक्ष ज्योतीबाई राठोड, भाऊराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके, लियाकत अन्सारी, डॉ. नदीम, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्रकाश सोनावणे, रामकिशन ओझा, सचिव शाह आलम शेख आदी उपस्थित होते.

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी बोलताना खा. अशोक चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्य चुकीच्या धोऱणांवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, भाजप शिवसेनेचे सरकार मराठवाड्यावर जाणिवपूर्वक अन्याय करत आहे. अप्पर पैनगंगेगेचे ६५ टीएमसी पाणी इतरत्र वळवण्याचा घाट सरकारने घातला आहे. हे पाणी वळवल्यास हदगाव, भोकर, मुदखेड, अर्धापूर, उमरी, धर्माबाद, यवतमाळ, हिंगोलीला पाणी मिळणार नाही. याबाबत आपण मुख्यमंत्री आणि राज्यपालांना भेटून पाणी वळवण्यास विरोध केला आहे. तरीही सरकारने पाणी वळवल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करू असा इशारा खा. चव्हाण यांनी दिला.

राज्यात सोळा हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीही सरकारला काही फरक पडत नाही. भाजप शिवसेनेचे मंत्री सत्तेचा भोग घेण्यात व्यस्त आहेत त्यांना मरणा-या शेतक-यांकडे पाहायला वेळ नाही. शेतक-यांना जिवंत असताना सरकार एक रूपयाची मदत करत नाही. आत्महत्या केल्यावर एक लाख रूपये देऊन काय उपयोग आहे? आमचा माणूस परत येणार आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी सरकारला केला. मोदींच्या सॅटेलाईटमध्ये दुष्काळ दिसला नाही. त्यामुळे तालुके दुष्काळाच्या यादीतून वगळले असे मंत्री सांगतात. मोदींच्या सॅटेलाईटला सर्वसामान्य शेतक-यांची दुःख दिसत नाहीत असे खा. चव्हाण म्हणाले.

नांदेड जिल्ह्यात अकराशे विद्युत ट्रान्सफॉर्मर जळाले आहेत. सरकार साधे विद्युत ट्रान्सफॉर्मर देऊ शकत नाही. ते ही शेतक-यांना स्वतःच्या खर्चाने दुरुस्त करून आणावे लागतात. एवढी वाईट वेळ कधी महाराष्ट्रावर आली नव्हती असे खा. चव्हाण म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्षाला दोन कोटी नोक-या देण्याचे आश्वासन दिले होते आता मात्र सुशिक्षित तरूणांना पकोडा विकण्यास सांगून त्यांची क्रूर थट्टा करत आहेत.

आपलेच पैसे काढण्यासाठी या सरकारने बँकेसमोर सर्वसामान्यांना उभे केले. दुसरीकडे इंधन दरवाढ करुन जनतेच्या खिशाला कात्री लावली. केंद्राप्रमाणेच राज्य सरकारचा कारभारही नियोजनशून्य असल्याचे सांगत कर्जमाफीची सरकारने केवळ घोषणा केली. प्रत्यक्षात शेतक-यांच्या ओंजळी रिकाम्याच राहिल्या आहेत. या सरकारला धडा शिकविण्यासाठी येणा-या लोकसभा, विधानसभेची संधी चुकवू नका, असे आवाहनही त्यांनी केले. सर्वसामान्यांच्या विकासाचा शब्द देवून हे सरकार सत्तेत आले. मात्र सत्ता हाती आल्यानंतर जनतेला विसरले. आज देशाचे संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे. दुसरीकडे देशातील सर्वोच्च यंत्रणा या सरकारच्या अवाजवी हस्तक्षेपामुळे आपली स्वायतत्ता गमावत असल्याचे सांगत चार वर्षात सरकारने देशातील लोकशाहीसमोरच आव्हान उभे केले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, सेना-भाजप सरकारच्या कारभाराला शेतक-यांसह राज्यातील सर्वच घटक वैतागले आहेत. चार वर्षातील या सरकारच्या कार्यकाळात तब्बल १६०० शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी युती शासन केवळ भाषणबाजी करण्यामध्ये गुंग असल्याचे सांगत राज्याचा कारभार हाकण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे ते म्हणाले.

Advertisement
Advertisement
Advertisement