Published On : Sat, Feb 29th, 2020

लोकसंग्राहक वृत्तीमुळेच कार्यकर्ते सुमतीताईंशी जोडले गेले : नितीन गडकरी

बालजगतमध्ये स्व. सुमतीताई सुकळीकर स्मृतिदिन

नागपूर: स्व. सुमतीताई सुकळीकर यांचा संघर्षशील स्वभाव, लोकसंग्राहक वृत्ती आणि कार्यकर्त्यांवर मातृवत प्रेम करण्याची सवय यामुळेच हजारो कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले. कारण कार्यकर्ता हा आपल्या परिवारातीलच आहे असे समजून त्या व्यवहार करायच्या, त्यामुळेच कार्यकर्त्यांना त्या आईप्रमाणेच वाटत होत्या, असे प्रतिपादन केंद्रीय सडक परिवहन, सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

दीनदयाल शोध संस्थानच्या बालजगततर्फे आज स्व. सुमतीताई सुकळीकर स्मृति दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रामुख्याने माजी न्या. मीराताई खडक्कार, वीरेंद्रजित सिंह, प्रख्यात उद्योजक प्रभाकरराव मुंडले, सौ. मुंडले, जगदीश सुकळीकर व अन्य उपस्थित होते.

याप्रसंगी आपले विचार व्यक्त करताना गडकरी म्हणाले- ताईंचे जीवन कार्यकर्ता म्हणून आदर्श आहे. प्रतिकूल परिस्थितीशी झगडत त्यांनी पक्षाचे कार्य केले. मानसन्मान, प्रतिष्ठा नसण्याचा तो काळ होता. राजकीयदृष्ट्या त्यांनी कधी यश मिळू शकले नाही, याची कार्यकर्त्यांना खंत आहे. मला विशेष खंत आहे. तेव्हाच्या आणि आजच्या राजकीय परिस्थितीत खूप मोठा फरक आहे. ज्या भागात आमच्या पक्षाच्या उमेदवारांची जमानत जप्त होत होती, त्या भागात आज आमच्या पक्षाचे उमेदवार विजयी होत आहेत. हे केवळ प्रतिकूल परिस्थितीत ताईंनी आणि त्यांच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी केलेल्या संघर्षामुळे शक्य झाले आहे. त्यामुळेच आजच्या विजयाचे श्रेयही त्या कार्यकर्त्यांचेच आहे, असेही गडकरी म्हणाले.

बालजगत ही एक त्यांची स्मृतीच उभारली गेली आहे, असे सांगताना गडकरी म्हणाले- सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी सामाजिक सेवेचा वसा घेतला व आपल्या जीवनाच्या शेवटपर्यंत हे कार्य ताईंनी सुरु ठेवले होते. त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करणे शक्यच नाही. त्यांनी उभे केलेल्या समाज आणि राजकारणाच्या पायावरच आमचे जीवन आहे. ताईंचे जीवन जवळून पाहण्याची संधी मला लाभली. दीपस्तंभासारखे समर्पित जीवन त्यांचे होते.

याप्रसंगी प्रभाकरराव उपाख्य भय्यासाहेब मुंडले यांचाही सत्कार नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. भय्यासाहेब यांनी केलेल्या कार्याचा गौरव याप्रसंगी गडकरींनी केला. सामाजिक आणि राजकीय कार्यात त्यांचे योगदान मोठे असल्याचेही ते म्हणाले.

बालजगतमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि चाहते उपस्थित होते