Published On : Mon, Aug 26th, 2019

देवेंद्र व नरेंद्र यांच्यामुळे आपलं भवितव्य चांगलं नाहीय- जयंत पाटील

तुम्ही आम्हाला भगव्याला हात लावू नका सांगताय तुमची महापुरुषांच्या फोटोला हात लावायची लायकी नाही- धनंजय मुंडे

बीड – आपलं भवितव्य आपणच ठरवायचं आहे. देवेंद्र व नरेंद्र यांच्यामुळे आपलं भवितव्य चांगलं नाहीय असे आवाहन राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी गेवराई येथील जाहीर सभेत तरुणांना केले.

बॅलेटपेपरवर मतदान घ्या सगळी जनता मागणी करत आहे परंतु भाजपच अशाप्रकारची मतदान पद्धत घ्यायला तयार नाही असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

जनतेचा पराभवाचा आदेश मान्य करायचा असतो तसा मान्य करुन आम्ही कामाला लागलो आहोत असेही जयंत पाटील म्हणाले.

आज देशात नवीन समस्या निर्माण झाली आहे. बेकारी कशी असते, मंदी कशी असते हे आज पहायला मिळत आहे. जेटमध्ये लाखो लोक बेकार झाले आहेत. नोकरीसाठी वणवण भटकावे लागत आहे. गाड्या तयार करणारे कारखाने बंद होत आहेत. सहा लाख कंपन्या बंद पडल्या आहेत. मागणी नाही पुरवठा करणारी यंत्रणा नाही याचा अर्थ काय देशाच्या अर्थव्यवस्थेसोबत खेळ सुरु आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

या देशात नोकर्‍या लागल्या नाहीत तर यांच्या काळात नोकर्‍या गेल्या आहेत.१८३ आश्वासनापैकी १४८ आश्वासनांकडे देवेंद्र फडणवीस सरकारने लक्षच दिलेले नाही.ज्याच्यामागे चौकशी लागलीय ते पक्ष सोडून जात आहे. शरद पवार यांच्या विचाराशी बांधील असलेला सच्चा कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला नाही असे सांगतानाच ज्यांचा २० – २० वर्ष लालदिवा हटला नाही त्यांनी का पक्ष सोडावा हा खरा प्रश्न आहे अशी जोरदार टीका जयंत पाटील यांनी केली.

*तुम्ही आम्हाला भगव्याला हात लावू नका सांगताय तुमची महापुरुषांच्या फोटोला हात लावायची लायकी नाही- धनंजय मुंडे*

विनोद तावडे तुम्ही तर महापुरुषांच्या फोटोत घोटाळा केलात. तो भ्रष्टाचार मी पहिल्यांदा बाहेर काढला आणि तुम्ही आम्हाला भगव्याला हात लावू नका सांगताय तुमची महापुरुषांच्या फोटोला हात लावायची लायकी नाही असा जोरदार हल्लाबोल धनंजय मुंडे यांनी गेवराई येथील जाहीर सभेत केला.मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर धनंजय मुंडे यांनी जोरदार टिकास्त्र सोडताना गाडीला जसं लिंबू मिरची बांधली जाते तशी इथल्या आमदाराचे लिंबू आणि मुख्यमंत्र्यांचे गाजर गाडीला बांधण्याची गरज आहे असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांचं गाजर माहीत होतं परंतु आता इथे आमदाराचे लिंबू हा नवीन प्रकार ऐकायला मिळाला. मग आता गाजर आणि लिंबू बांधायला तर हवेच ना… हवे की नको असा सवाल धनंजय मुंडे यांनी जमलेल्या विराट जनसमुदायाला केला. त्यावेळी ‘बांधलेच पाहिजे’ असा एकच आवाज घुमला.

आमच्यावर वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप करता तुमच्या २२ मंत्र्यांचे ९० हजार कोटीचे भ्रष्टाचार पुराव्यानिशी बाहेर काढले. भ्रष्टाचारी यात्रा बोलता मी आरोप केलेल्या मंत्र्यांचे पुरावे देतो या एका व्यासपीठावर होवुन जावुदे दुध का दुध पानी का पानी असे जाहीर आव्हान धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.


धनंजय मुंडे बोलत असताना सभेतून अनेक तरुण आम्हाला नोकर्‍या नाहीत ओरडून सांगत होते. महापोर्टल बंद करा पोलीस भरती दोन वर्ष झाली नाही या वेदना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे मांडतांना दिसत होते. त्यावेळी मी ओरडून ओरडून सांगतोय यांना निवडून देवू नका नाहीतर पुन्हा त्याच खाईत लोटले जाल असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले.

गेवराईमध्ये परिवर्तन होणार आहे हे कुणी सांगायची गरज नाही असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

सेना – भाजपची सत्ता उलथून टाकण्याचा ‘पण’ तरुणांनी केलाय – खासदार डॉ. अमोल कोल्हे

शिवसेना – भाजप सरकारची सत्ता उलथून टाकण्याचा ‘पण’ राज्यातील तरुणांनी केला आहे असे सांगतानाच तरुणांमध्ये असंतोष,अस्वस्थता आहे याचा स्फोट आता होणार आहे अशी स्पष्ट भूमिका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मांडली.

९८३ कारखाने बंद पडले आहेत हे सरकारकडून सांगितले जात आहे मग कुठुन निर्माण होणार रोजगार भरती. म्हणून तुमच्या मनगटातील ताकद दाखवून द्या असे आवाहन डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

शिवस्वराज्य यात्रेत आम्हाला भगिनींकडून राखी बांधली जाते आणि दुसरीकडे महाजनादेश यात्रेत आंदोलन करतील म्हणून घाबरुन एका भगिनींला नजरकैदेत ठेवलं जाते ही परिस्थिती आज दिसत आहे असेही अमोल कोल्हे म्हणाले.

सरदार वल्लभभाई यांचा पुतळा गुजरातमध्ये उभा राहतो पुतळे उभारा त्यांच्या बद्दल आदर आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची साधी वीट रचू शकले नाहीत याचा विचार करा असे आवाहन अमोल कोल्हे यांनी केले. तुमची डिग्रीच बोगस आहे त्यांनी आम्हाला काय शिकवावे असा प्रतिसवाल डॉ. अमोल कोल्हे यांनी विनोद तावडे यांना केला.सत्ता नसताना पुरग्रस्तांना मदत राष्ट्रवादीने केली आणि सत्ता असलेले विनोद तावडे डबडं वाजवून भीक मागत होते. नशीब संभाजी राजांनी त्यांना घरचा आहेर दिला असा टोला लगावला.

हा महाराष्ट्र आता एकच लाट बघणार ती म्हणजे शरद पवार साहेबांची लाट येणार असेही खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.बीड जिल्हयातील वंचित आघाडीचे नेते रवींद्र पाटोळे यांनी असंख्य कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या सभेत विजयसिंह पंडित, अमोल मेटकरी, रुपाली चाकणकर यांनी आपले विचार मांडले.शिवस्वराज्य यात्रेचा आजचा सातवा दिवस असून गेवराई येथे भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार अमरसिंह पंडित, प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, युवा नेते विजयसिंह पंडीत, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार उषाताई दराडे आदींसह गेवराई तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.