Published On : Sat, Mar 14th, 2020

राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना उद्यापासून सुट्टी! दहावी-बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार

मुंबई : सध्या जगभरात थैमान घातलं आहे ते कोरोना व्हायरसने, कोरोनाच्या भीतीने सर्वच घटकांवर परिणाम झालेला आहे. सध्याचा महिना हा मार्च म्हणजेच महाराष्ट्रातील परीक्षांचा महिना. कोरोनाचा शिक्षण विभागावरसुद्धा परिणाम झालेला आपल्याला दिसत आहे.

आरोग्य विभागाकडून शिक्षण विभागाला आज प्रस्ताव देण्यात आला आणि तो शासनाकडून मंजूरही करण्यात आला आहे. राज्यातील शाळा आणि विद्यालयं 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याच्या प्रस्तावावर शिक्षण विभागाने तातडीने लक्ष घातलं आहे. या परिपत्रकानुसार सर्व नगरपालिका, महापालिका, नगरपंचायत शाळा, सरकारी आणि खाजगी शाळा आणि महाविद्यालयं 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येतील.

राज्यातील सर्व खाजगी, सरकारी शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत हद्दीतील शाळा बंद राहणार आहेत. या शाळा आणि महाविद्यालय मात्र शहरी भागातील आहेत, ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव आढळला नसल्याने ग्रामीण भागातील शाळा सुरू असतील. शाळांसोबतच अंगणवाड्याही बंद राहतील आणि आयटीआय कोर्सेसदेखील बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.


कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शिक्षण संस्थांनीही यात सहभाग दाखवावा आणि विद्यार्थ्यांनी व पालकांनीही यामध्ये सहकार्य करणं शासनाकडून अपेक्षित आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी यात काळजी करण्याचं कारण नाही; दहावी-बारावीची परीक्षा सध्या सुरू आहेत आणि या प्रस्तावात बोर्डाच्या परीक्षेचा उल्लेख नाही त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल नसेल. काल मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी-चिंचवड आणि पुणे येथील शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. आता संपूर्ण महाराष्ट्रातील शाळा-महाविद्यालयं बंद करण्यासाठीचा प्रस्ताव आल्यानंतर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शिक्षण विभाग लवकरच यासंबंधी निर्णय घेईल.

MPSC ची कोणतीही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली नाही कारण त्या परीक्षा पुढे ढकलता येत नाहीत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे, सोबतच MPSC आणि RTO ची परीक्षा उद्या पुण्यात होईल आणि यात कोणतेही बदल नसतील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यातील सर्व शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा, राजकीय कार्यक्रम यांची परवानगी जर दिली गेली असेल तर ती तातडीने रद्द करण्यात यावी असे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.