Published On : Sat, Mar 14th, 2020

जिल्हाधिकारी ठाकरेंनी केले लोकार्पण : प्रकोप टाळण्यासाठी उपाययोजनांचीही माहिती.

कोरोना बाबत जनजागृतीसाठी वेबपोर्टल

नागपूर: ‘कोरोना’ विषाणूचा प्रकोप टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. मात्र, अफवांमुळे भीती वाढत असून त्यावर नियंत्रणासाठी वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे. ‘कोरोना’बाबत जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज त्यांच्या कक्षात या वेबपोर्टलचे लोकार्पण केले.

कोरोनामुळे सामान्य नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. त्यात अफवांमुळे नागरिकांत वाढत असलेली दहशत रोखण्याचे जिल्हा प्रशासनापुढे मोठे आव्हान ठरत आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने जनजागृतीचे सर्व उपाय केले. याअंतर्गत शहरातील सोशल मिडिया विश्‍लेषक अजित पारसे यांनी तयार केलेल्या www.fightagainstcorona.social या वेबपोर्टलचे लोकार्पण आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले.

अजित पारसे यांनी तयार केलेले वेबपोर्टल नागरिकांना उपाययोजनासंदर्भात नक्कीच फायद्याचे ठरेल, असा विश्‍वास जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला. या वेबपोर्टलवर मराठी व इंग्रजीतून कोरोनाबाबत माहिती देण्यात आली आहे. कोरोनाची लागण कुणाला होऊ शकते, कशाप्रकारे होऊ शकते, लक्षणे आदीची माहिती देण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे मार्गदर्शक तत्त्व व उपाययोजनांचीही माहिती या वेबपोर्टलवर देण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवण्याऐवजी प्रत्यक्ष काय करावे, काय करू नये, याबाबत वेबपोर्टलवर माहिती देण्यात आली आहे. याशिवाय महापालिकेच्या नियंत्रण कक्षाचा क्रमांक, राज्य शासनाचा हेल्पलाईन क्रमांक, नियंत्रण कक्षाचा क्रमांक आदी माहितीसह जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी नागरिकांना या वेबपोर्टलवरून अफवांवर विश्‍वास ठेऊ नये, असे आवाहन केले आहे.


कोरोना रुग्णांची अद्ययावत आकडेवारी
जगातील कोरोना रुग्णांची अद्ययावत आकडेवारी एका ‘वर्ल्डोमिटर’द्वारे दिली जात आहे. हे वर्ल्डोमीटर जागतिक आरोग्य संघटनेने तयार केले आहे. या वेबपोर्टलवर ‘वर्ल्डोमिटर’द्वारे संशयित रुग्ण, गंभीर रुग्ण, उपचाराननंतर बरे झालेले रुग्ण, मृत्यू झालेल्या रुग्णांची अद्ययावत आकडेवारी देण्यात येत आहे.

नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेऊ नये. कोरोनाबाबत कुणीही अफवा, खोटे वृत्त, माहिती पसरवू नये. नागरिकांनी संयम बाळगत कोरोनाचा प्रकोप टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ज्या सूचना दिल्या आहेत, त्याचे पालन करावे. नक्कीच कोरोनावर मात करता येईल.
– रविंद्र ठाकरे, जिल्हाधिकारी.

सोशल मिडियावर कोरोनाबाबत नागरिकांनी कुठलीही चुकीची माहिती पोस्ट करू नये. सोशल मिडियाचा वापर करीत कोरोनाला ऑनलाईन व ऑफलाईन पसरविण्यापासून थांबविण्याची गरज आहे. या कोरोनाच्या माध्यमातून असामाजिक तत्त्वांना यशस्वी होऊ देऊ नये.

– अजित पारसे, सोशल मिडिया विश्‍लेषक