Published On : Thu, Oct 29th, 2026
By Nagpur Today Nagpur News

कामठीत अंमली पदार्थ तस्करांचा फिल्मी स्टाइलने पाठलाग; बॅरिकेडला धडकून कार पलटी, तिघांना अटक

Advertisement

कामठीत अंमली पदार्थ तस्करांचा फिल्मी स्टाइलने पाठलाग; बॅरिकेडला धडकून कार पलटी, तिघांना अटक

नागपूर : कामठी येथे अंमली पदार्थ तस्करीच्या प्रकरणात वांछित असलेल्या आरोपींचा पोलिसांनी फिल्मी स्टाइलने पाठलाग केला. पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेली टाटा हॅरियर कार ड्रॅगन पॅलेस मंदिर मार्गावरील मेट्रो रेल्वेच्या बांधकामस्थळावरील बॅरिकेडला धडकून पलटी झाली. त्यानंतर पोलिसांनी कारमधील तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. गुरुवारी पहाटे सुमारे ५.४० वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

नवीन कामठी पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन धनसिंग राठोड यांच्यामार्फत गुप्त माहिती मिळाली होती. एनडीपीएस कायद्यांतर्गत दाखल अंमली पदार्थ तस्करीच्या प्रकरणात वांछित असलेला मोहम्मद शारीक मोहम्मद रजीक हा त्याच्या दोन साथीदारांसह टाटा हॅरियर कारमधून यशोधरानगर परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचला. तिन्ही आरोपी घोरपड मार्गाने यशोधरानगरकडून कन्हानच्या दिशेने जात असताना पोलिसांनी ड्रॅगन पॅलेस मंदिर मार्गावर त्यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र, आरोपींनी कार न थांबवता वेगाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार मेट्रोच्या बांधकामस्थळावरील बॅरिकेडला धडकून पलटी झाली.

या कारवाईत मोहम्मद शारीक मोहम्मद रजीक (वय ३३, रा. वांजरा लेआउट, पिली नदी), अब्दुल करीम मोहम्मद मुकीम (वय ३०, रा. हमीद नगर, पिली नदी) आणि गुलाम यशदाणी मोहम्मद रशीद अन्सारी (वय २६, रा. फारुख नगर, टेका नाका, नागपूर) यांना ताब्यात घेण्यात आले. या घटनेप्रकरणी नवीन कामठी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१ आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तिन्ही आरोपींच्या अंमली पदार्थ तस्करीच्या प्रकरणातील भूमिकेबाबत पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.