नागपूर : मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेला आरोपी विशाल गुप्ता उर्फ ‘फल्ली’ याच्या श्रावण नगर येथील घरातून एमडी ड्रग्जच्या कथित व्यवहारांचा हिशेब असलेली डायरी गुन्हे शाखेच्या हाती लागली आहे. गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाने बुधवारी दुपारी या घराची झडती घेतली. यावेळी डायरीसह सोन्याचे एक ब्रेसलेट, दोन अंगठ्या, कानातील झुमके आणि काही रोख रक्कम जप्त करण्यात आली. या डायरीत नोंदवलेल्या व्यवहारांची तपासणी सुरू असून, त्यातून एमडी ड्रग्जच्या कथित नेटवर्कशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या श्रावण नगर येथील घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात विशाल गुप्ता उर्फ फल्ली याचे नाव समोर आले आहे. एमडी ड्रग्ज तस्करीच्या आरोपांमुळे त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अलीकडेच त्याला त्याच्या महिला मैत्रिणीसह रामेश्वरम येथून अटक करून नागपुरात आणण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, फल्ली हा त्याची महिला मैत्रीण सहेली पंधराम हिच्यासोबत श्रावण नगर येथील घरात राहत होता. याच घराची चावी घेऊन गुन्हे शाखा युनिट-५ चे निरीक्षक विनायक गोल्हे आणि त्यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली घराचे कुलूप उघडून झडती घेतली. पथकाने घराच्या कानाकोपऱ्याची तपासणी केली असता एमडी ड्रग्जच्या कथित व्यवहारांशी संबंधित डायरी मिळाली.
या डायरीतील नोंदींच्या आधारे ड्रग्जच्या व्यवहारांमध्ये सहभागी असलेल्या इतर व्यक्तींची नावे तसेच आर्थिक देवाणघेवाणीचे तपशील समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. सध्या डायरीतील माहितीची पडताळणी सुरू असून, त्यातील नोंदी आणि संबंधित व्यक्तींची भूमिका तपासानंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासात पुढील काळात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.




