
नागपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असताना शेतकऱ्यांची पिके करपून जात आहेत, मात्र सरकारकडून ठोस निर्णय घेतला जात नसल्याचा आरोप काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी केला. नागपुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली.
कर्नाटकातील काँग्रेस सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांसाठी तातडीने उपाययोजना केल्या. मग महाराष्ट्रातील सरकार दुष्काळ जाहीर करण्यास विलंब का करत आहे, असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला. केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असतानाही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याचे त्यांनी म्हटले.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकारला पत्र दिले आहे. यापूर्वी विरोधी पक्षांनी राज्यपालांची भेट घेऊन दुष्काळी परिस्थितीची माहिती दिल्याचेही पटोले यांनी सांगितले. भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरमधील धान उत्पादक शेतकरी अडचणीत असून धान खरेदी केंद्रांवरील कथित गैरप्रकारांचे पुरावे विधानसभेत मांडल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, महायुतीतील घटक पक्षांमध्ये अंतर्गत मतभेद आणि कुरघोडी सुरू असल्याचा आरोपही पटोले यांनी केला. सत्ताधारी पक्षांतील संघर्षाचा परिणाम राज्याच्या कारभारावर होत असल्याचे ते म्हणाले.




