Published On : Sat, Jul 18th, 2020

पारेषण वाहिन्यांची पाहणी व देखभालीची कामे आता ड्रोनव्दारे होणार

Advertisement

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पाठपुरावा केल्याने केंद्राने दिली परवानगी

मुंबई : राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने आता महापारेषण ड्रोनच्या साहाय्याने अति उच्च दाब वाहिन्यांची निगा राखण्याचे व देखभाल दुरुस्तीची कामे अचूक व जलदगतीने करणार असून वीज क्षेत्रात ड्रोनचा वापर करणारी महापारेषण सध्या देशातील एकमेव कंपनी ठरली आहे.

यापुढे महापारेषण आपल्या अति उच्च दाब वाहिन्यांची देखभाल जसे ग्राऊंड पेट्रोलिंग, टॉवर टॉप पेट्रोलिंग, सर्व्हे आदी कामे ड्रोनव्दारे करणार असून यासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक विभागाने परवानगी दिली आहे. यामुळे महापारेषणचा वेळ, पैसा व मनुष्यबळाची बचत होणार आहे.

महापारेषण ड्रोनचा वापर करत असल्याची नोंद केंद्र सरकारने घेतली असून या स्तुत्य उपक्रमाचे केंद्राने कौतुक केले आहे.

ऊर्जामंत्री डॉ राऊत व महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश वाघमारे यांनी सतत पाठपुरावा करून महापारेषणला ड्रोन उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला असून विजेच्या क्षेत्रात महाराष्ट्रात नवे नवे प्रयोग होत असल्याने सर्वत्र याचे कौतुक होत आहे. प्रशिक्षित चमुद्वारे ड्रोनचा कुशल प्रकारे वापर करण्यात येत आहे.

महापारेषण ही देशातील सर्वात मोठी पारेषण कंपनी असून राज्यात एकूण 681 इएचव्ही उपकेंद्रे असून 48321 सर्किट किलोमीटरच्या पारेषण वाहिन्या आहेत. सध्या महापारेषण कडे 1,27,990 एमव्हीए क्षमतेची परिवर्तन क्षमता असून 25000 एमडब्ल्यू ऊर्जा हाताळणीची क्षमता असलेली पारेषण यंत्रणा आहे. विशेषतः दुर्गम भागातून जाणाऱ्या, समुद्रकिनारी व खाडीलगतच्या भागात पारेषण वाहिन्यांची कामे करताना ड्रोनचा उपयोग चांगल्या रीतीने होणार आहे.

ड्रोनवर व्हिडिओ कॅमेरा व थर्मोव्हिजन कॅमेरा लावला असल्यामुळे पारेषण वाहिन्यांवर निर्माण होणारे विविध दोष त्वरित निदर्शनास आणून त्यांची तात्काळ दुरूस्ती करणे शक्य झाले आहे.

विशेषतः नवीन प्रकल्पाचे सर्व्हेक्षण करण्यासाठीही या ड्रोन कॅमेराचा उपयोग होणार आहे. टॉवरच्या अगदी जवळ जाऊन ड्रोनव्दारे तपासणी होत आहे. त्यामुळे हे डायग्नोस्टिक टूल ठरले आहे. तसेच कार्यालयात बसून ड्रोनची हालचाल पाहणेही शक्य झाले आहे. नियमानुसार ड्रोन उडविण्याची उंची ५० मीटरपर्यंत आहे. ड्रोनचा वापर अतिशय कुशलतेने करीत असल्याबद्दल डॉ. नितीन राऊत यांनी महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश वाघमारे यांच्यासह महापारेषणच्या सर्व चमूचे कौतुक केले आहे