Representational Pic
मुंबई: नवीन वर्ष 2018 चं स्वागत करण्यासाठी मुंबईकरांनी 31 डिसेंबर 2017 ला मोठा जल्लोष केला. या सेलिब्रेशनदरम्यान मद्यपान करुन गाडी चालवणाऱ्या वाहनचालकांवर मुंबई वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केली. मद्यपान केल्यानंतर गाडी चालवणाऱ्या 613 चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. 600 हून अधिक मद्यपी वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
मद्यपान केल्यानंतर वाहन चालवू नका, असं आवाहन वारंवार पोलिसांकडून केलं जातं. मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन अनेक जण अपघातांना निमंत्रण देतात. हे रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कंबर कसली होती. त्याशिवाय ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’मध्ये सापडणाऱ्या वाहनचालकांविरोधातील कायदेही कठोर करण्यात आले आहेत.
दुसरीकडे, नागपुरातही तळीरामांवर मोठी कारवाई करण्यात आली. नागपूर पोलिसांकडून मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 770 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. 31 डिसेंबरच्या संध्याकाळी 6 वाजल्यापासून 1 जानेवारीच्या पहाटेपर्यंत केलेल्या कारवाईत अनेक वाहनं जप्त करण्यात आली.