Published On : Mon, Jan 1st, 2018

लोकशाही दिनातील प्रलंबित तक्रारीचा 15 जानेवारीपर्यंत निकाली काढा – सचिन कुर्वे


नागपूर: जिल्हा लोकशाही दिनात दाखल होणाऱ्या जनतेच्या तक्रारींची दखल घेवून केलेल्या कार्यवाहीबद्दल संबंधित तक्रारदारांना तक्रारी संदर्भात माहिती देण्यासोबतच विभाग प्रमुखांकडे प्रलंबित असलेल्या तक्रारी 15 जानेवारीपर्यंत निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आज दिल्यात.

जिल्हा लोकशाही दिनी जिल्हयातील जनतेच्या तक्रारी व गऱ्हाणी निवासी उपजिल्हाधिकारी बी.एस. घुगे यांनी स्वीकारल्या लोकशाही दिनात ग्रामीण भागासह शहरातील सुमारे 15 तक्रारी दाखल झाल्यात. तक्रारदाराने आपल्या तक्रारी संदर्भात गऱ्हाणी लोकशाही दिनात मांडल्यात त्यांच्या तक्रारी संबंधित विभागाकडे पाठवून एक महिन्यात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तक्रारदारांना लेखी स्वरुपात कळवावा, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

जिल्हा लोकशाही दिनात विविध 71 विभागांकडे 165 तक्रारी प्रलंबित असून प्रलंबित असणाऱ्या तक्रारी तात्काळ निकाली काढाव्यात, अशा सूचना करताना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी नगर भूमापन, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नझूल, भूमापन अधिकारी क्रमांक 1 व 2 , उपसंचालक शिक्षण, सहआयुक्त अन्न व प्रशासन, लोकल फंड मुख्य कार्यकारी अधिकारी, अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभाग, उपजिल्हाधिकारी महसूल, मुख्याधिकारी नरखेड, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद, तहसिलदार नरखेड, आदी विभागांकडे प्रत्येकी 4 पेक्षाजास्त तक्रारी प्रलंबित आहेत. तसेच इतर विभागाकडेही प्रलंबित असलेल्या तक्रारी संदर्भात 15 जानेवारीपूर्वी निर्णय घेण्याचे सूचना संबंधित विभागांना दिल्यात. यावेळी विभाग प्रमुख उपस्थित होते.